अकोला: कापसाचे बियाणे घाऊक बाजारात आले आहे; परंतु या बियाण्याची विक्री १ जूननंतरच होणार आहे. जिल्ह्यात यावर्षी १ लाख ५० हजार हेक्टर एवढे कापूस पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आठ लाख बीटी कपाशीची पाकिटे उपलब्ध झाली आहेत. जिल्ह्यात जवळपास ६४० कृषी निविष्ठा विक्रेते आहेत. योग्य दराने बियाणे मिळावे, यासाठी शेतकऱ्यांनी या अधिकृत विक्रेत्याकडून बियाणे घेणे गरजेचे आहे. यावर्षी बीजी-१ कापसाचे दर ६३५ रुपये बीजी-२ या कापसाच्या पाकिटाचे दर ७३० रुपये आहेत. हे बियाणे परवानाधारक विक्रेत्याकडून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याची गरज आहे. बीजी-३ हे बियाणे अधिकृत नसल्याने शेतकºयांनी याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. यावर्षी १ मेनंतर कपाशी बियाण्याची पाकिटे विकण्याची परवानगी देण्यात आली होती; परंतु यामध्ये आता बदल करण्यात आला असून, १५ मेनंतर कपाशी बियाण्याची पाकिटे वितरकांकडे पोहोचविण्यात आली आहेत. १ जूननंतर कपाशीचे बियाणे शेतकºयांना उपलब्ध केले जाणार आहे. गुलाबी बोंडअळीने कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. गतवर्षी यावर नियंत्रण मिळवण्यात कृषी विभाग, कृषी विद्यापीठाला यश आले आहे; परंतु गुलाबी बोंडअळीचा धोका टळलेला नाही. यावर्षी खबरदारीचा उपाय म्हणून मे महिन्याच्या अखेरीस किंवा १ जूनपासून बीटी कपाशीची विक्री सुरू होईल, अशी माहिती कृषी निविष्ठा विपणन अभ्यासकांनी दिली. दरम्यान, शेंदरी अळीचा प्रकोप टाळण्यासाठी शेतकºयांनी पूर्वहंगामी कपाशीची पेरणी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.