लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : कापूस खरेदीसाठी शेतकर्यांना ऑनलाइन नोंदणी करण्याची अट लादण्यात आली आहे; मात्र पातूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कापूस खरेदी केंद्र गेल्या दोन वर्षांपासून बंदच असल्याने नोंदणी कुठे करावी, असा प्रश्न तालुक्यातील शेतकर्यांना पडला आहे. खरीप हंगाम २0१७-१८ मध्ये हमीदरावरील कापूस खरेदीसाठी पणन महासंघाने शेतकर्यांना सात-बारा, आधार कार्ड, बँक पासबुकच्या सविस्तर माहिती असलेल्या पहिल्या पानाची स्पष्ट झेराक्स, आयएफसी कोड, खाते क्रमांक, ब्रँच कोड आदी माहिती देऊन ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. नोंदणी करण्याची व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समितीने करण्याची सूचना पणन महासंघाने दिली होती; मात्र तरीही पातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्यांची नोंदणी करण्यासाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. एवढेच नव्हे, तर नोंदणी करण्यासाठी आवश्यक कर्मचारीही उपलब्ध करून दिले नसल्याचे चित्र आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत असलेल्या दोन तीन सेवकांना अधिकृत करणे व त्या सेवकांची नावे जवळच्या कापूस पणन महासंघाच्या विभागीय कार्यालयात कळविणे, त्याबरोबरच सदर पद्धतीचा अवलंब १८ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा आदेश बाजार समित्यांना दिला आहे.
पातूर येथील बाजार समितीतील कापूस खरेदी केंद्र गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्याबरोबरच कापूस खरेदी करण्यासाठी मान्यता नाही. त्याबरोबरच सचिव आणि एक वगळता येथे एकही कर्मचारी नाही. - संजय भगत, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पातूर.