समाधान वानखडे
वणी रंभापूर : यावर्षी पाऊस लवकर पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. तालुक्यात प्रारंभी दमदार पावसाने हजेरीही लावली. त्यामुळे तालुक्यातील काही भागात शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. यंदा तालुक्यात कपाशीचा पेरा घटणार असून, सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, तालुक्यात बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला असून, शेतकऱ्यांची भटकंती होत आहे.
कृषी विभागामार्फत गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना घरचे बियाणे वापरावे, पेरणीयोग्य पाऊस झाल्यास पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गतवर्षी कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नव्हता. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिल्याचे चित्र आहे. तालुक्यात कपाशीचे क्षेत्र घटण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, सोयाबीनचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे वळल्याचे दिसून येत आहे. (फोटो)
--------------------
१,०८,३०७ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी
अकोला तालुक्यात कपाशीचा पेरा ४१ हजार हेक्टर, सोयाबीन ५० हजार हेक्टर, तूर सहा हजार हेक्टर, उडीद दोन हजार हेक्टर, मूग आठ हजार हेक्टर, ज्वारी एक हजार ३०७ हेक्टर अशी एकूण १,०८,३०७ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी करण्यात येणार असल्याच्या अंदाजाची माहिती कृषी विभागाने दिली आहे. तालुक्यात मृग नक्षत्रात काही प्रमाणात पाऊस पडल्याने ०.०४ टक्के हेक्टरवर पेरण्या आटोपल्या असल्याची माहिती आहे.
----------------------
तालुक्यात जवळपास ५० टक्के सोयाबीन पिकाचे क्षेत्र आहे. त्यामुळे कृषी विभागाने यावर्षी अष्टसूत्रीचा प्रचार सुरू केला. बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी करणे, १०० मिलीमीटर पाऊस पडल्यावरच पेरणी करणे, पेरणीपूर्व बीज प्रक्रिया आदींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरू आहे.
-डी. एस. प्रधान, तालुका कृषी अधिकारी, अकोला.