तेल्हारा : तालुक्यात यावर्षी पावसाने लवकर हजेरी लावली असल्याने काही बागायती व कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. आता मात्र पावसाने दांडी मारली असून, ऊन तापत असल्यामुळे शेतकरी चिंतित दिसत आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार तेल्हारा तालुक्यात यंदा कपाशी, सोयाबीन पिकाचा पेरा वाढणार आहे.
गतवर्षी सुरुवातीला पाऊस कमी पडल्यामुळे तसेच रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला होता. यासोबतच कपाशीवरसुद्धा बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे कपाशीच्या उत्पादनात घट झाली होती. गतवर्षी सुरुवातीला मूग, उडीद व सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी सोयाबीन, कपाशी पिकाकडे वळणार नाहीत, असा कयास होता. परंतु कृषी विभागाच्या अंदाजानुसार तेल्हारा तालुक्यात २३ हजार हेक्टर कपाशी आणि १८ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने यावर्षी पाऊस लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्याप्रमाणे पावसाने हजेरीसुद्धा लावली. बागायती शेतकऱ्यांनी सिंचनाची व्यवस्था असल्याने पेरणी केली. मात्र सोबतच कोरडवाहू शेतकऱ्यांनीसुद्धा बऱ्याच प्रमाणात पेरणी केली. काहींच्या पेरण्या आटोपल्या. मात्र गेल्या तीन दिवसांपासून कडक ऊन तापत आहे. त्यामुळे काहींनी पेरणी थांबविली. मात्र ज्यांनी पेरणी केली व त्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था नाही. अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता सतावत आहे.
फोटो:
पेरणीकरिता किमान १०० मिमी पावसाची आवश्यकता असून, केवळ ४० मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून, तालुक्यात ६ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. सोयाबीनची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येऊ शकते.
- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा
तेल्हारा तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढणार
तालुक्यात २३ हजार हेक्टरवर कपाशी, तर १८ हजार हेक्टरवर सोयाबीन आणि सात हजार हेक्टरवर तूर, पाच हजार हेक्टरवर मूग, उडदाची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला जात असून, तसे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशीचे क्षेत्र घटणार असून, सोयाबीनचे क्षेत्र वाढणार असल्याचे दिसून येत आहे.