अकोला, दि. १५- विदर्भातील नगदी पीक कापूूस खरेदीला वेग आला असून, यावर्षी समाधानकारक व पोषक पाऊस झाल्याने कापसाचा एकरी उतारा सरासरी सात ते आठ क्विंटल लागला आहे; पण नोटांच्या विमुद्रीकरणाचा परिणाम कापूस विक्रीवर झाला आहे.राज्यात गतवर्षी ३८ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली होती. यावर्षी ३८ लाख १४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे क्षेत्र केवळ १३ हजार हेक्टरने कमी झाले आहे. समाधानकारक पावसामुळे उत्पादन होणार असल्याचे चित्र आहे. राज्यात मराठवाडा, खान्देश व सोलापूर जिल्हय़ांचा भाग तसेच विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्हय़ांत कापूस उत्पादन घेतले जाते. कापूस हे नगदी पीक आहे; परंतु पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम कापूस उत्पादनावर झाला आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून कापसाचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने विदर्भातील शेतकर्यांनी यावर्षी कापसाचे क्षेत्र कमी केले. असे असले तरी पश्चिम विदर्भात आठ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर पैदासकार, पायाभूत व प्रमाणित कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. या प्रक्षेत्रावरील कापूस बहरला असून, चंद्राप्रमाणे रात्री पांढर्या शुभ्र कापसाने शेतं उजळून निघाली आहेत. येथील उत्पादनही एकरी ८ ते ९ क्विंटल असल्याने पुढच्या वर्षी देशी कापसाचे बियाणे शेतकर्यांना सहज उपलब्ध होईल, अशी कृषी तज्ज्ञांना अपेक्षा आहे.
- कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर कापूस फुलला असून, एकरी आठ ते नऊ क्विंटलचा उतारा (उत्पादन) येत आहे. त्यामुळे यावर्षीची स्थिती समाधानकारक आहे.डॉ. टी.एच. राठोड,विभाग प्रमुख,कापूस संशोधन, डॉ. पंदेकृवि, अकोला.