एकरी पाच ते सहा क्विंटलचा उतारा : बोंड अळीचा फटका
हातरूण : बाळापूर तालुक्यात कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात होता. सध्या कापसाची उलंगवाडी सुरू झाली आहे. यंदा कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने एकरी पाच ते सहाच क्विंटलचा उतारा लागला. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम हा तोट्यात गेला आहे.
खरीप हंगामात सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुरुवातीला मूग, उडीद पिकावर अज्ञात व्हायरसने आक्रमण केल्याने हातचे पीक गेले. त्यानंतर परतीच्या पावसामुळे सोयाबीनची नासाडी झाली. शेतकऱ्यांच्या भरवशाचे पीक असलेले कापसाचे पीक बहरलेले असल्याने उत्पादन होण्याची शेतकऱ्यांना आशा होती; मात्र पहिल्याच वेचणीत कपाशीवर बोंड अळीने आक्रमण केल्याने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवघ्या तीन ते चार वेचणीतच कपाशीचे पीक उलंगवाडीवर आले असून, उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. सध्या शेतकरी कपाशीची उलंगवाडी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (फोटो)
-----------------------
बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाय
कपाशी पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभागामार्फत फरदळीचा कापूस टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी कपाशीची उलंगवाडी सुरू केली आहे.
----------------------------------
बोंड अळीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, एकरी पाच ते सहा क्विंटलच उत्पादन झाले आहे. त्यामुळे शासनाने पीकविमा मंजूर करून शेतकऱ्यांना लाभ द्यावा.
- शेतकरी
-------------------------------------
लागवडीचा खर्चही निघेना
खरीप हंगामातील कपाशी पिकासाठी शेतकऱ्याला एकरी २८-३१ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो, परिणामी बोंड अळीमुळे उत्पादन घटल्याने एकरी उत्पन्न २५ ते३० हजार रुपयेच होत असल्याने लागवडीचा खर्चही वसूल होत नाही.
------------------