लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात दर कोसळल्याने भारतातील दरात प्रतिक्विंटल ७00 ते ८00 रुपये घट झाली असून, उच्च प्रतीच्या लांब धाग्याच्या कापसाला आजमितीस ४,८00, तर खेड्यात खरेदी केल्या जात असलेल्या कापसाला ३,९00 ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर दिले जात आहेत. मागील पंधरवड्यात हेच दर प्रतिक्विंटल ५४00 ते ५,६00 रुपयांवर गेले होते. दरम्यान, २९ जानेवारीपर्यंत देशात १ कोटी ९0 लाख गाठींच्यावर बाजारात आवक झाल्याचा अंदाज उद्योजकांनी वर्तविला. यावर्षी शेतकर्यांनी कापूस पीक पेरणीवर भर दिला असून, राज्यात १0 टक्के कापसाचे क्षेत्र वाढले आहे. आता भारतीय बाजारपेठेसह सर्वत्र कापसाची मागणी वाढली असली, तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमी झाल्याने भारतात हे दर घटले. सोमवारी खासगी बाजारात कापसाचे प्रतिक्विंटल दर ४,८00 रुपयांपर्यंत कमी झाले. त्यामुळे कापूस बाजारपेठेत १ लाख ९0 हजार गाठी कापसाची खरेदी करण्यात आली.
खेडा खरेदी ३,९00 रुपयांवरअनेक व्यापारी खेड्यात जाऊन कापूस खरेदी करतात. सध्या ही खरेदी जोरात आहे. पण, दर मात्र ३,९00 ते ४ हजार रुपये प्रतिक्ंवटल दिले जात आहेत.
सरकीच्या दरात ५0 रुपयांनी वाढ कापसापासून मिळणार्या सरकीचे दर प्रतिक्विंटल १,९00 रुपये होते, या दरात ५0 रुपयांनी वाढ झाली. सरकीच्या दरात वाढ झाली, तर कापसाच्या दरात वाढ होते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दर कोसळले असले, तरी आपल्याकडे कापसाचे दर वाढण्याची शक्यताही व्यापारी वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात (न्यूर्याक कॉटन) कापसाचे दर कमी झाल्याने त्याचे परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाले असून, कापसाचे दर हे सरासरी सहाशे ते सातशे रुपयांनी घटले. पण, यामध्ये पुढे सुधारणा होण्याची शक्यताही आहे.- वसंत बाछुका, कापूस उद्योजक, अकोला.