- राजेश शेगोकार
अकोला : माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात झालेल्या गेल्या वर्षी झालेल्या कापूस, सोयाबीन, धान उत्पादन शेतकऱ्याची ‘कासोधा’ परिषद झाली. यशवंत सिन्हा सारखे देशव्यापी व थेट पंतप्रधान मोदींना भिडणारे नेतृत्व या आंदोलनाला मिळाल्याने हे आंदोलन लक्षवेधी ठरले. अकोल्यात कधी नव्हे तर भाजपा वगळता सर्वच पक्षांनी या आंदोलनाला पाठींबा देत सहभाग घेतला. सरकारवर दबाव वाढला व थेट मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करीत मागण्या मान्य असल्याचे लेखी पत्र जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिले व आंदोलनाची सांगता झाली. मात्र वर्षभर या मागण्यांकडे सरकारने ढुंकनही पाहिले नाही त्यामुळे शेतकरी जागर मंचने दूसºया ‘कासोधा’ परिषदेची हाक देऊन वातावरण निर्मिती केली. यावेळी यशवंत सिन्हांच्या जोडीला शत्रुघ्न सिन्हा व आपच्या नेत्यांची भर पडली मात्र जुन्याच मागण्यांच्या पुर्ततेसाठी जुनाचा फंडा वापरण्याचा प्रयत्न झाला अन् अखेर पुन्हा आश्वासनांची भेेंडोळी हातात घेऊन परिषदेच्या आंदोलनाची सांगता झाली. कासोधा परिषदेच्या निमित्ताने शेतकºयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या प्रत्यक्षात मात्र आंदोलनाची भूमिका तयार करण्यात जिंकलेली कसोधा परिषद प्रशासनासोबत चर्चा करताना हरली व जुन्याच वळणावर येऊन थांबल्याचे चित्र आहे.यशंवत सिन्हा यांच्या आक्रमक भूमिकेमुळे या गेल्यावर्षी तीन दिवस झालेले हे आंदोलन यावर्षी अवघ्या तीन तासात आटोपले. सिन्हांसह शेकडो आंदोलक पोलिस कवायत मैदानात ठाण मांडून बसले. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता,यावेळी प्रशासनानेही आधीच तयारी केली होती. तगडा बंदोबस्त अन् गावागावातील कार्यकर्त्यांना नोटीस बजावून आधीच धमकाविण्यात आले होते मात्र तरीही परिषदेवर फारसा फरक पडला नाही. दूसरीकडे गेल्यावर्षी झालेल्या परिषदेसाठी जागर मंचला गावागावात जवळपास दोनशे बैठका पुर्वतयारीसाठी घ्याव्या लागल्या होत्या यावेळी मात्र एवढया मोठया प्रमाणात बैठकांची गरज भासली नाही कारण शेतकºयांना ‘कासोधा’ आंदोलनाची ओळख झाली होती. तर यावर्षी दूष्काळाची पृष्ठभूमी लक्षात घेता मागील आश्वासनांचा जाब व शेतकºयांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारला कोंडीत पकडण्याची रणनिती जागर मंचाने तयार केली असेल अशीच सर्वसामान्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र भाषणांचा तोच सुरू,तेच आरोप व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तोच ठिय्या याची पुनरावृत्ती झाल्याने प्रशासनानेही मागील प्रमाणचे अश्वासनांचे लेखी पत्र देऊन ‘बोळवण’ करण्याची पुनरावृत्ती केली.