अकोला: इयत्ता दहावी, बारावी परीक्षेला सुरुवात होणार आहे. परीक्षांच्या काळात अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. हेल्पलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.दहावी, बारावी परीक्षेचा काळ हा विद्यार्थी आणि पालकांसाठी तणावाचा असतो. अधिकाधिक गुण मिळविण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. पालकही सातत्याने अभ्यास कर, मार्कस् कमी मिळतील, असा तगादा लावत असतात. अभ्यासक्रमातील विषय, प्रश्नपत्रिकेमध्ये येणारे कठीण प्रश्न, परीक्षेबाबतच्या शंका, पेपर संदर्भातील माहिती आणि पालकांचा भडीमार यामुळे विद्यार्थी तणावात येतात. बºयाचदा विद्यार्थी चुकीचा निर्णय घेतात. विद्यार्थ्यांचा तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आणि त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शकांसोबतच बाह्य समुपदेशकांच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळाने हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनद्वारे तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २0 मार्चदरम्यान होणार आहे तर इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्च ते २२ मार्चदरम्यान होणार आहे. या काळात सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. पेपर कठीण आहे. परीक्षेसंदर्भात काही शंका आहेत. त्यादृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी हेल्पलाइन सुरू करून समुपदेशन करण्यात येणार आहे.-शरद गोसावी, अध्यक्षविभागीय शिक्षण मंडळ.