--------------------
वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान
माना : येथील पावसामुळे अंकुरलेली पिके पाण्याखाली गेली आहेत. गत दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिके पिवळी पडण्याची शक्यता आहे. अशातच परिसरात वन्य प्राण्यांचे कळप पिकांत शिरून नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
----------------------------------------
आगर परिसरात दुबार पेरणीचे संकट
आगर : अकोला तालुक्यातील आगर परिसरात बुधवारी झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांनी महागडे बियाणे, खते खरेदी करून पेरणी केली; परंतु अतिवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
-----------------
पाणवठ्याजवळच रेतीचे अवैध उत्खनन
कवठा : येथील रेती घाट लिलाव झालेला नसताना गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या नदीपात्रातील विहिरीजवळ अवैधरीत्या रेती उत्खनन सुरू आहे. यामुळे पाणी पातळी खोल जाऊन पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
--------------
खेड्यांमध्ये सिलिंडरची बेकायदा वाहतूक !
अकोट : ज्वलनशील वायू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची ग्रामीण भागात बेकायदा वाहतूक केली जात असल्याचे दिसत आहे. यावर पुरवठा विभागाने लक्ष देण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
----------------------
बसफेऱ्या नियमित सोडण्याची मागणी
आलेगाव : एसटी महामंडळाच्या पारस मार्गावरच्या मुक्कामी बसफेऱ्या बंद आहेत. यामुळे ग्रामीण भागातून शहरात कामानिमित्त येणाऱ्यांची गैरसोय होत आहे. बस नियमित सोडण्यात याव्या, अशी मागणी आलेगाव परिसरातील प्रवाशांकडून होत आहे.
-------------------------
प्रवाशांनी मास्क वापरण्याचे आवाहन
अकोला : कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली. मात्र, संकट कायमच असल्याने एस.टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खबरदारी म्हणून तोंडाला मास्कचा वापर करावा. यासह एस.टी.त चढताना व उतरताना फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन आगारप्रमुख करीत आहेत..
----------------
मुत्रीघरांची स्वच्छता करण्याची मागणी
वाडेगाव : येथील मुख्य चौकातील मुत्रीघरांची दुरवस्था झाली असून, अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे या परिसरात स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पुरेशा प्रमाणात पाणी नसल्याने ही समस्या सध्या बिकट झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
---------------------
शौचालयाची समस्या निकाली काढा
बार्शीटाकळी : परिसरातील जुने शौचालय पाडून त्याठिकाणी नवे सार्वजनिक शौचालय बांधावे. ज्या कुटुंबांकडे शौचालये नाहीत त्यांना त्यांच्या घरासमोरील जागेत शौचालय बांधण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.
---------------------------
महावितरणकडून ग्रामीण भागात वसुली
अकोट : महावितरणने वीज बिल वसुली मोहीम सुरू केली आहे. थकीत वीज बिल न भरणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही मोहीम सुरू आहे. अवाजवी वीज बिल भरण्यास नागरिकांचा विरोध दिसून येत आहे.
--------------------------
वीज चोरीप्रकरणी कारवाईची मागणी
तेल्हारा : येथे गेल्या महिनाभरापासून सर्रासपणे खांबावर आकडे टाकून विजेची चोरी केली जात आहे. यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वीज चोरी करणाऱ्यांवर महावितरणने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
-----------------------
अकोला शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव
अकोला : शहरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरात अनेकांना मोकाट कुत्र्यांनी दंश करून जखमी केल्याच्या घटना समोर येत आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
----------------------