आगर : आगर येथील एकाच समाजाचे युवक व युवती एकमेकांच्या प्रेमात पडले. साेबत जीवन-मरणाच्या आणाभाका घेतल्या. परंतु, कुटुंबीयांचा प्रेमसंबंधास विरोध असल्याने, दोघेही पळून गेले होते. मुलगी अल्पवयीन असल्याने, पोलिसांनी प्रियकरास अटक केली हाेती. मुलीचे वय विवाहयोग्य झाल्याने, दोघांनी पुन्हा पळून जाऊन रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केले आणि दोघे गावी परतले.
आगर येथे एकाच समाजातील युवक, युवतीचे सूत जुळले. परंतु, याची भनक कुटुंबीयांना लागली. त्यांच्या प्रेमसंबंधास विरोध होत असल्याने, दोघांनीही गतवर्षी घरातून पळ काढला. मुलीकडच्यांनी युवकाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. अल्पवयीन मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, युवक कारागृहातून सुटून आल्यावर काहीकाळ प्रेयीयुगुल गप्प बसले. मुलीचे वय विवाहयोग्य झाल्यामुळे दोघांनी पुन्हा गावातून पलायन केले आणि पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनासुद्धा या प्रकरणात हस्तक्षेप करता आला नाही. मुलगी सज्ञान झाल्यामुळे ४ मे रोजी प्रेमीयुगुल गावात आले. ५ मे रोजी त्यांनी रीतिरिवाजाप्रमाणे विवाह करून घडलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.