बोरगाव वैराळे : बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे गावाला स्वतंत्र पाणीपुरवठा करणाऱ्या कूपनलिकेला पाणी नसल्याने गत काही महिन्यांपासून गावात होणार पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून, नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे. तसेच काही नागरिक पिण्यासाठी पाणी विकत घेऊन आपली तहान भागवित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नवीन कूपनलिका खोदून गावातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे हे गाव खारपाणपट्ट्यात येत असून, सन २००० पासून गावाला येथून जवळच असलेल्या अकोला तालुक्यातील दुधाळा येथील कूपनलिकेवरून पाणीपुरवठा होत होता; मात्र मागील काही महिन्यांपूर्वी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या कूपनलिकेचे पाणी आटल्यामुळे कूपनलिका कोरडी पडली आहे. तेव्हापासून गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. तसेच तहान भागविण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे स्थानिक ग्रामपंचायतीकडे कराची वसुली झाली नसल्यामुळे नवीन कूपनलिका खोदता आली नाही. यामुळे बोरगाव वैराळे येथे नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडे पाणी टंचाईच्या निधीतून नवीन बोअरवेल खोदून देण्याची मागणी केली आहे.
------------------------------------------------
नागरिकांना घ्यावे लागते पाणी विकत
कूपनलिकेवरून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पाणी विक्री व्यवसाय करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.