अकोला : कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील सातही कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बेफिकिरीने वावरणारे होम आयसोलेशनमधील रुग्णांवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. मात्र, यासाठी आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. कोरोनाकाळात नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना मध्यंतरी सेवेतून कमी करण्यात आल्याने आरोग्य विभागासमोर ही मोठी अडचण निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. गंभीर रुग्णांची संख्या वाढल्याने त्याचा संपूर्ण ताण सर्वोपचार रुग्णालयांवर आल्याचे दिसून येत आहे. दरम्यानच्या काळात जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने बहुतांश कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले होते. त्यामुळे वाढलेल्या रुग्णसंख्येचा ताण आरोग्य यंत्रणेवर दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सोमवारपासून जिल्ह्यातील सात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आरोग्य यंत्रणेकडे नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. परिणामी, कमी वेळेत कंत्राटी मनुष्यबळ उभारण्याचे मोठे आव्हान आराेग्य यंत्रणेसमोर असणार आहे.
अनेकांचे वेतन रखडले
कोविडकाळात कंत्राटी तसेच रोजंदारी तत्त्oावर आरोग्य सेवेत रुजू झालेल्या काही कर्मचाऱ्यांना मागील सहा महिन्यांपासून वेतनाची प्रतीक्षा असल्याची माहिती आहे. या कर्मचाऱ्यांचे मानधन कोविड फंडातून दिले जाणार होते. मात्र, त्यासाठी पैसाच शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी हे कर्मचारी मानधनाच्या आशेने अजूनही आपली सेवा देत असल्याचे चित्र सर्वोपचार रुग्णालयात दिसून येते.
त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करून घेण्याची मागणी
कोविडकाळात नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता सेवेतून कमी करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याची मागणी कास्ट्राइब कर्मचारी संघटनेसह विविध संघटनांकडून केली जात आहे.