अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये समाजकल्याण विभागाचे जिल्ह्यातील सहा वसतिगृहे व चार निवासी शाळा कोविड केअर सेंटरसाठी पुन्हा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. वसतिगृहे व निवासी शाळांमध्ये कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया प्रशासनामार्फत सुरु करण्यात आली आहे.
गत महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार करण्याकरिता जिल्ह्यात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार समाजकल्याण विभागाची जिल्ह्यातील सहा वसतिगृहे व चार निवासी शाळा कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. अकोला शहरातील चार, अकोट येथील दोन वसतिगृहे तसेच शेळद, पाटसूळ, गोरेगाव व शेलूवेताळ येथील प्रत्येकी एक निवासी शाळा कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहित करण्यात आल्या असून, त्यामध्ये कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्याची प्रक्रिया प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी गतवर्षी एप्रिल ते डिसेंबर अखेरपर्यंत समाजकल्याण विभागाची जिल्ह्यातील वसतिगृहे व निवासी शाळा कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कोविड केअर सेंटरसाठी समाजकल्याण विभागाची जिल्ह्यातील वसतिगृहे व निवासी शाळा पुन्हा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यासाठी समाजकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यातील सहा वसतिगृहे व चार निवासी शाळा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
-माया केदार
सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग.