अकोला: कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या संपर्कातील संशयित रुग्णांना मुक्कामी ठेवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कोविड केअर सेंटरचे गठन करण्यात आले. या ठिकाणी मूलभूत सुविधांची वानवा असल्यामुळे शुक्रवारी रात्री दक्षिण झोनमधील सुमारे १८ संशयित रुग्ण मनपाच्या सिटी बसमधून घरी परतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराचा रात्री ऊहापोह झाल्यानंतर शनिवारी सकाळी रुग्णांसाठी गादी व त्यावरील चादरी आदी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे.कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील निकटवर्तीय संशयित रुग्णांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील असुविधांमुळे त्या ठिकाणी जाण्यास नकार दिला होता. ही बाब पाहता मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मनपाच्या भरतीया रुग्णालयात संशयित रुग्णांचे नमुने घेण्यास प्रारंभ केला. संशयित रुग्णांचे नमुने घेतल्यानंतर त्यांचा अहवाल येईपर्यंत त्यांना घरी न ठेवता पीडीकेव्ही परिसरात ‘क्वारंटीन’ करण्याच्या प्रस्तावावर २७ मे रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी एकमताने निर्णय घेतला. त्यानुषंगाने मनपाच्या भरतीया रुग्णालयातील नमुने घेण्याचे केंद्र बंद करीत ते पीडीकेव्ही परिसरात हलविण्यात आले. या ठिकाणी २८ मेपासून संशयित रुग्णांचे नमुने घेण्यास सुरुवात करणार असल्याचा दावा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केला होता. कृषी विद्यापीठ परिसरातील कोविड केअर सेंटरमध्ये पुरेशा सुविधांची पूर्तता न करताच जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने घाईघाईत या ठिकाणी संशयित रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था केली. रुग्णालय प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे परिणाम समोर येऊ लागले असून, शुक्रवारी रात्री दक्षिण झोनमधील तब्बल १८ रुग्णांना मुक्कामी राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे घरी परत यावे लागल्याचा प्रकार घडला आहे.सकाळी आणल्या गाद्या!कृषी विद्यापीठ परिसरात नमुने देण्यासाठी गेलेल्या अकोट फैल, तारफैल भागातील रुग्णांचे नमुने न घेतल्यामुळे त्यांना घरी परत यावे लागल्याचा प्रकार २८ मे रोजी घडला होता. तसेच शुक्रवारी रात्री झोपण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे दक्षिण झोनमधील संशयित १८ रुग्ण घरी परतले. अखेर सामान्य रुग्णालय प्रशासनाच्यावतीने शनिवारी सकाळी रुग्णांसाठी गाद्या आणण्यात आल्या.
शिवनेरीमध्ये ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांची व्यवस्था!कृषी विद्यापीठातील शिवनेरी-अ व शिवनेरी-ई या दोन इमारतींमध्ये एकूण ३६ खोल्या असून, या ठिकाणी सुमारे २०० रुग्णांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तूर्तास या इमारतीमध्ये ९० पॉझिटिव्ह रुग्ण मुक्कामी आहेत.