अकोला : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यानंतर कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून आली. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश कोविड केअर सेंटर बंद करून लक्षणे नसणाऱ्या कोविड रुग्णांना होम आयसोलेशनमध्येच ठेवण्यास सुरुवात करण्यात आली. यातील बहुतांश रुग्णांकडून बेफिकिरी होत असल्याचे समोर आले. या बेफिकिरीमुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ७४६ वर पोहोचला आहे. ॲक्टिव्ह रुग्णांची वाढती संख्या अकोलेकरांसाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा ठरत आहे. १६ जानेवारीपासून जिल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक लोक निर्धास्त झाले असून शहरात बेफिकिरीने फिरताना दिसून येत आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात कोविडच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातील बहुतांश रुग्णांचा घरीच मुक्काम आहे. सप्टेंबर महिन्यानंतर जिल्ह्यातील कोविड रुग्णालय वगळल्यास उर्वरित कोविड सेंटर बंद करण्यात आले. त्यामुळे पॉझिटिव्ह येणारे बहुतांश रुग्ण होम आयसाेलेशनमध्ये ठेवण्यात येत आहेत. यातील सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांकडून बेफिकिरी झाल्यास कोरोना संसर्गाचा फैलाव होण्याचा धोका वाढत आहे. कोरोनाचा फैलाव राेखण्यासाठी होम आयसोलेशनमधील पॉझिटिव्ह रुग्णांकडून सक्तीने नियमांचे पालन होणे अनिवार्य आहे, मात्र तसे होताना दिसून येत नाही.
आयसोलेशन काळातही रुग्ण इतरांमध्ये मिसळतात
वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांनी किमान १५ दिवस इतरांच्या संपर्कात येणे टाळणे आवश्यक आहे. मात्र, अनेक रुग्णांकडून या नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. त्यामुळे हा प्रकार कोविडच्या फैलावासाठी कारणीभूत ठरत आहे.
पॉझिटिव्ह येऊनही रुग्णांसोबत संपर्क नाही
रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्ण स्वत: होम आयसोलेशन किंवा रुग्णालयात दाखल होतो, तर अनेक रुग्णांना त्याचा अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हेच माहीत नसते. त्यामुळे अहवाल येताच महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे संबंधित रुग्णाशी संपर्क साधणे आवश्यक आहे, परंतु रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर चार ते पाच दिवसांनंतर त्याच्याशी महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा संपर्क होतो. दरम्यानच्या काळात संबंधित रुग्ण नकळत इतरांच्याही संपर्कात येत असल्याने कोरोनाचा धोका वाढत आहे.
रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला लक्षणे नसतील, तर होम आयसाेलेशनमध्ये ठेवण्यात येते. अशा रुग्णांनी नियमित मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे, कुटुंबातील इतर सदस्यांच्या संपर्कात न येणे आदी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोविड नियमांचे पालन न करणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांवर कारवाईदेखील होऊ शकते. रुग्णांनी नियमांचे पालन करावे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, अकोला