अकोला : एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय खर्चामध्ये कोविड-१९ या आजाराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची बाधा झाल्यास खर्च मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सातव्या वेतन आयोग; शिक्षक वंचित!
अकोला : राज्य शासनाने शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे, मात्र कालबद्ध पदोन्नती व आश्वासित प्रगती योजनापासून अनेक कर्मचारी वंचित असल्याचा आरोप महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने केला आहे. त्यासंदर्भात राज्य शासनाने लक्ष देऊन शिक्षकांना लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.
पेट्रोल पंपांवर कोरोना नियमांचे उल्लंघन!
अकोला : कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात ‘नो मास्क, नो पेट्रोल’ अशी मोहिम राबविण्यात आली होती. मात्र आता या मोहिमेला हडताल फासल्या जात आहे. कुठल्याही पेट्रोल पंपवर मास्कची विचारणा केली जात नाही. तसेच मास्क नसेल तर दंडात्मक कारवाईसुद्धा मंदावली आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही मोहिम पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.
विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ!
अकोला : शैक्षणिक वर्ष २०१७-१८ आणि २०१८-१९ यामध्ये खरीप हंगामात दुष्काळ पडला होता. त्यामुळे या दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा विभागीय आयुक्तांनी केली आहे.
हरभरा ४६०० रुपये प्रतिक्विंटल!
अकोला : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक वाढली असून, हरभऱ्याला चांगला भाव मिळत आहे. गेल्या दोन दिवसात ४ हजार ते ४ हजार ८५० असा भाव मिळाला असून, सरासरी भाव ४ हजार ६०० एवढा आला आहे.
अवैध प्रवाशी वाहतूक फोफावली!
अकोला : शहराती जुने बस स्थानक, मध्यवर्ती बस स्थानक, टाॅवर चाैक, अकोट स्टँड, वाशिम बायपास या परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक होत आहे. या प्रवाशी वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने ही वाहतूक निर्बंधपणे सुरू असल्याचे दिसत आहे.
सावित्रीबाईंना अभिवादन!
अकोला : महात्मा फुले सेवा संस्था तसेच सर्वशाखीय माळी समाज परिचय मेळाव्याच्या विद्यमाने सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळकृष्ण काळबांडे, रामदास खंडारे, सुनील उंबरकार, ज्ञानेश्वर बोदडे, प्रकाश वानखडे आदी उपस्थित होते.
‘विहिंप’च्यावतीने कोरोना चाचणी
अकोला : गोळवलकर गुरुजींच्या जयंतीनिमित्ताने विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कोरोना चाचणी घेण्यात आली. यावेळी २०० नागरिकांचा स्वॅब घेण्यात आला. आयोजनासाठी डाॅ. आशिष गिऱ्हे, प्रकाश गोगलिया, सुरेंद्र जयस्वाल, पिंटू शास्त्री आदींनी पुढाकार घेतला.