अकोला: कोविडच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या लक्षणीय होती. त्यात अनेकांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजनच्या खाटा मिळाल्या नाहीत. त्यामुळे खाटांच्या शोधात राज्यातील सुमारे १२ जिल्ह्यातील रुग्णांनी अकोला गाठत जीएमसीत उपचार घेतले. उपचारातून अनेकांचे जीव वाचविणे शक्य झाले, तरी उशिरा उपचार मिळाल्याने सुमारे ३०८ रुग्णांना जीव गमवावा लागला. राज्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेने चांगलेच थैमान घातले. गंभीर रुग्णांची संख्या जास्त असल्याने अनेक जिल्ह्यात रुग्णांना खाटा मिळणेही कठीण झाले होते. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून अनेक रुग्णांनी खाटांच्या शोधात शेजारील जिल्ह्यांमध्ये धाव घेतली. सुरुवातीला वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील रुग्ण अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी येऊ लागले. अकोल्यात कोविड खाटा उपलब्ध होत असल्याची माहिती झाल्यानंतर नागपूरसह हिंगोली, नांदेड, भंडारा, यवतमाळ, जळगाव, औरंगाबा, सोलापूरसह नवी मुंबई येथील रुग्णही उपचारासाठी अकोल्यात आले. जीएमसीत आतापर्यंत सुमारे १२३८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी ९३० रुग्ण हे अकोला जिल्ह्यातील असून, उर्वरित ३०८ रुग्ण बाहेरील जिल्ह्यातील आहेत.
जीएमसीत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या
जिल्हा - मृत्यू संख्या
बुलडाणा - १८५
वाशिम - ६८
हिंगोली - ०९
अमरावती - २९
नांदेड - ०२
भंडारा - ०२
यवतमाळ - ०४
औरंगाबाद - ०१
जळगाव - ०२
नागपूर - ०४
सोलापूर - ०१
नवी मुंबई ०१
----------------
एकूण - १२३८
मनुष्यबळ कमी असूनही वाचविले अनेकांचे प्राण
कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या लक्षणीय होती. यामध्ये बहुतांश रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले होते. शिवाय, बाहेरील जिल्ह्यातील अनेक रुग्णांनी अकोल्यातील जीएमसीतच उपचारासाठी धाव घेतली होती. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत येथील मनुष्यबळ अपुरे ठरत होते; मात्र रुग्णालय प्रशासनासोबतच येथील वैद्यकीय अधिकारी, व कर्मचाऱ्यांनी हिंमत न हारता कोविडच्या रुग्णांची रुग्णसेवा निरंतर सुरू ठेवली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचविण्यात जीएससीला मोठे यश आले.
अकोल्यासह बाहेरील जिल्ह्यातील अनेक रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले होते. यातील अनेकांचे प्राण वाचविणे शक्य झाले; मात्र लांबचा पल्ला गाठून आलेले रुग्ण रुग्णालयात दाखल झाले तोवर त्यांची प्रकृती आणखी गंभीर झालेली होती. अशा रुग्णांनी उपचारास साथ दिली नाही. असे असले तरी अनेक गंभीर रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला