अकोला : मोठ्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात कोविड लसीकरणास सुरुवात झाली. त्यामुळे लसीकरणाचा पहिला दिवस उत्साहाचा गेला, मात्र दुसऱ्याच दिवशी लस घेतलेल्या काही लाभार्थ्यांना रिॲक्शन झाल्यानंतर जिल्ह्यात कोविड लसीकरणाची टक्केवारी घसरली आहे. रिॲक्शनच्या भीतीमुळे आता अनेकांमध्ये धाकधूक असल्याने लसीकरणाची टक्केवारी घसरल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवात झाल्याने अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी लाभार्थी वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले. लस घेतल्यानंतर दिवसभरात कुणालाही रिॲक्शन झाल्याचे समोर आले नाही, मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी काही कर्मचाऱ्यांना थंडी वाजून ताप येणे, थकवा जाणवणे, हलका ताप आल्याची प्रकरणे समोर आली. त्यामुळे उर्वरित लाभार्थी असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम लसीकरणाच्या दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात पाहावयास मिळाला. पहिल्या दिवसाच्या तुलनेत लसीकरणाची टक्केवारी घसरल्याचे दिसून आले.
१९ टक्क्यांनी कमी झाले लसीकरण
पहिल्या दिवशी जिलह्यात ७९.३३ टक्के कोविड लसीकरण झाले होते. त्यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयात १०० टक्के लसीकरणाला प्रतिसाद मिळाला होता. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर १९ जानेवारीपासून पुन्हा लसीकरणास सुरुवात झाली. यावेळी मात्र केवळ ६०.३३ टक्केच लसीकरण झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे जिल्हा स्त्री रुग्णालयातील लसीकरण ६० टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले. १९ जानेवारी रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयात केवळ ४० टक्के लाभार्थींनी लस घेतल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले.
घाबरू नका, लसीकरण सुरक्षीत
कुठलीही लस घेतल्यावर त्याचे काही परिणाम दिसून येतात. ताप येणे, अंग दुखणे ही लक्षणे लसीकरणानंतर येणे साहजिक असून ती सर्वांमध्येच जाणवत नाहीत. आतापर्यंत ज्यांनी लस गेतली, त्यापैकी केवळ पाच ते दहा टक्के लोकांमध्ये या प्रकारची लक्षणे दिसून आले. त्यामळे लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याची गजर नाही, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
अशी आहे लसीकरणाची स्थिती
दिवस - झालेले लसीकरण (टक्क्यांमध्ये )
१६ जानेवारी - ७९.३३
१९ जानेवारी - ६०.३३
लसीकरणानंतर रिॲक्शन येणे हे साहजिक आहे. कुठल्याही लसीकरण मोहिमेप्रमाणे कोविड लसीकरणात पाच ते दहा टक्के लोकांमध्येच या प्रकारची रिॲक्शन दिसून येते. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. कोविड लसीकरण सुरक्षित आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण