अकोला : सप्टेंबर महिन्यातच कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ३८ टक्के लोकांनी पहिला डोस घेऊन लसीचे कवच मिळवले आहे. लसीकरणाचा हा वेग असाच कायम राहिल्यास जवळपास ५० टक्के लोक कोविडच्या गंभीर प्रभावापासून सुरक्षित राहू शकतील. मात्र, लहान मुलांसाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कुठलेच प्रतिबंधात्मक उपाय नसल्याने त्यांच्यावरील तिसऱ्या लाटेचं संकट कायम आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोविडची स्थिती नियंत्रणात आहे. कोविडमुळे मृत्यू होण्याच्या घटनांना ‘ब्रेक’ लागला असून, नव्याने पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे अकोलेकरांना दिलासा मिळाला, मात्र सप्टेंबर महिन्यातच कोविडची तिसरी लाट येऊ शकते, अशी शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी व्हावे, या अनुषंगाने लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३८ टक्के लोकांनी लसीचा पहिला, तर १७ टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तज्ज्ञांच्या मते, लस घेणाऱ्यांना कोविडची लागण झाली, तरी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता फार कमी असते.
त्रिसुत्रीच देईल चिमुकल्यांना संरक्षण
सध्यातरी कोविड प्रतिबंधात्मक लस ही मोठ्यांसाठीच उपलब्ध आहे.
लहान मुलांच्या लसीकरणावर अजूनही संशोधन सुरूच आहे.
त्यामुळे सद्यस्थितीत लहान मुलांच्या संरक्षणासाठी त्रिसुत्रीचे पालन करणेच योग्य ठरेल.
प्रत्येक कुटुंबातील मोठ्यांनी त्रिसुत्रीचे पालन करावे तसेच लहान मुलांनादेखील त्याविषयी जागरूक करावे.
नियमित मास्कचा वापर, वारंवार हात धुणे तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे या नियमांचे पालन करावे.
कोविड होऊ नये म्हणून तुम्ही सतर्क आहात का?
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले आहे.
त्या अनुषंगाने खाटांचे नियोजन, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची जुळवाजुळव आरोग्य यंत्रणा करत आहे.
मात्र, कोरोना होऊच नये, यासाठी नागरिकांमध्ये सतर्कता दिसत नाही.
गर्दीच्या ठिकाणी जातानाही लोकांना मास्कचा विसर पडला आहे.