जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम १५३ केंद्रावर सुरू सुरू होती, मात्र लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने हळुहळु लसीकरण केंद्र बंद पडू लागले. शुक्रवारी जिल्ह्यात लसीचे केवळ १५८० डोस शिल्लक होते. त्यापैकी ११७० डोस कोविशिल्डचे, तर ४१० डोस कोव्हॅक्सिनचे होते. शनिवारी जिल्ह्यात मोजक्याच केंद्रावर कोविड लसीकरण मोहीम सुरू ठेवण्यात आली होती. दुपारपर्यंत या केंद्रावरीलही लस संपल्याने केवळ ८१७ लाभार्थींनाच लस मिळू शकली. त्यामुळे अनेकांना लस न घेताच घरी परतावे लागले. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविड लसीचे जिल्ह्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन मिळून सुमारे ७६३ डोस उपलब्ध असल्याची माहिती आहे.
लस मिळेपर्यंत मोहीम ठप्प होण्याची शक्यता
जिल्ह्यातील कोविड लसीचा साठा संपल्याची माहिती आहे. लसीचा पुढचा साठा अद्यापही जिल्ह्याला उपलब्ध झाला नाही. त्यामुळे लसीकरण मोहीम ठप्प झाली असून, आणखी साठा उपलब्ध होईपर्यंत ही मोहीम ठप्पच राहण्याची शक्यता आहे.
काही तासांपुरताच सुरू राहील लसीकरण
आरोग्य विभागाकडे लसीचे सुमारे ७६३ डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे काही मोजक्याच केंद्रावर मोहीम सुरू राहिली, तरी ती काही तासांपुरतीच सुरू राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दुसऱ्या डोससाठी करावी लागणार प्रतीक्षा
सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्ह्याला कोव्हॅक्सिनचे डोस मिळणार आहेत, परंतु ते देखील कमी असणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोविड लसीकरण पूर्ण क्षमतेने सुरू होणे शक्य नसणार आहे. ही लस केव्हा मिळणार याबाबत स्पष्टता नसल्याने दुसऱ्या डोससाठी लाभार्थींना लसीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.