अकोला : कोविडच्या आतापर्यंत दोन लाटा येऊन गेल्या आहेत. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण जास्त होते. मात्र, एकूण रुग्णसंख्येचा विचार केल्यास ८० टक्के रुग्णांमध्ये अतिसौम्य किंवा लक्षणेच नसल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. तज्ज्ञांच्या मते, अजूनही अनेक लोकांमध्ये कोरोनाची अतिसौम्य लक्षणे असू शकतात. अशा रुग्णांच्या माध्यमातून कोविड छुपा वार करून तिसऱ्या लाटेस निमंत्रण देऊ शकतो. त्यामुुळे शंका येताच नागरिकांनी कोविडची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे. कोविडच्या रुग्णांमध्ये २० टक्के रुग्णांना लक्षणे आढळून आली, तर ८० टक्के रुग्णांमध्ये अतिसौम्य किंवा लक्षणेच नसल्याची माहिती समोर आली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील कोविडची स्थिती नियंत्रणात आली असून, दररोज पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या दहाच्या आत आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग नियंत्रणात येताच चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे कोविडची लक्षणे नसलेले, तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे निदान होत नसल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे बाजारपेठ पूर्ववत सुरू झाल्याने गर्दी वाढली आहे. वाढलेल्या गर्दीमध्ये अशा रुग्णांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही बेफिकरी पुन्हा अंगलट येण्याची शक्यता
नियम व अटींसह बाजारपेठ सुरू करण्यात आली आहे. मात्र, अनेकांकडून नियमांचे पालन हाेताना दिसत नाही.
बहुतांश नागरिक विनामास्क गर्दीच्या ठिकाणी संचार करीत आहेत, तर प्रतिष्ठानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही.
ऑटोमध्येही विनामास्क क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी संख्या
धावत्या वाहनांतून रस्त्यावर थुंकण्याची अनेकांची सवयदेखील कोरोनाला निमंत्रण देऊ शकते.
शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांची स्थिती
एकूण रुग्ण - ग्रामीण भाग - शहरी भाग
५७,७५९ - २६,८०५(४६.४१ टक्के) - ३०,९५४ (५३.५९ टक्के)
अशी आहे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची स्थिती
लोरिस्क कॉन्टॅक्ट - ७,७०,७६१
हायरिस्क कॉन्टॅक्ट - ३,६०,२७५
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पेंडिंग - २,२०२
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पूर्ण - ५६,८३८
सद्य:स्थितीत कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. मात्र, कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी बेफिकिरी करून चालणार नाही. कोरोनापासून बचावासाठी नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करावे. कोविडच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता चाचणी करून घ्यावी. आपल्यापासून इतरांपर्यंत कोरोनाचा संसर्ग पसरू नये याची दक्षता घ्यावी.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ