लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला (अकोला): मातेसमान पुजल्या जाणा-या गायींप्रती कृतज्ञता व्यक्त करणयासाठी दरवर्षी डिसेंबरच्या सुरूवातीला शिर्ला येथे अभिनव अशी ‘गाय पंगत’ दिली जाते. यानिमित्त गावात जत्रा देखील भारते. दरवर्षी गायींचया सन्मानार्थ आयोजित केला जाणारा हा सोहळा सोमवार, ४ व ५ डिसेंबर रोजी शिर्ला येथे आयोजित करण्यात आला आहे.
यात्रा सुरू होण्यापूर्वी सकाळी १0.३0 वाजता येथील वयोवृद्ध भीमराव गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील संपूर्ण गायींना गोस्मारकावर पिंपळाच्या झाडाखाली एकत्रित केले जाते. त्या ठिकाणी प्रत्येक घरी थापून आणलेल्या भाकरीचा बंडीरथ गाडगे परिवारातील सदस्य गावातून ओढत आणतात. रथामागे सर्व गावकरी डोक्यावर टोपी चढवून महिला डोक्यावर पदर घालून पिं पळाच्या झाडाखाली येतात. येथे सर्व गायींना भाकरीचा नैवेद्य खायला दिला जातो. विधिवत पूजन भीमराव गाडगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री ना. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार बळीराम सिरस्कार, जि. प. अध्यक्ष संध्या वाघोडे, जि. प. सदस्य मनोहर हरणे, पंचायत समिती सदस्य अपर्णा संदीप इंगळे, तहसीलदार डॉ. आर.जी. पुरी, गटविकास अधिकारी शेखर शेलार, ठाणेदार डी.सी. खंडेराव, सरपंच रिना संजय शिरसाट आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
४ आणि ५ डिसेंबर रोजी दोन दिवसीय यात्रेला लग्न करून गेलेल्या लेकी माहेरी शिर्ला येथे परत येतात. दरम्यान, पाहुण्यांना रोडगे, उडिदाची डाळ व भाकरीचा पाहुणचार केला जातो. यात्रेत लहान मुलांची रंगीबेरंगी विविध प्रकारची खेळणी, आकाश पाळणे, विविध प्रकारचा खाऊ, महिलांची आभूषणे, भांडी दुकाने यात्रेचे आकर्षण ठर तात. मोठय़ांना कामामुळे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्यांना एकत्रित येणाचे गाय पंगत यात्रा एकमेव माध्यम आहे. त्याबरोबरच गायींच्या सन्मानार्थ यात्रा भरवणारे शिर्ला अकोला जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.