बोरगाव मंजू(जि. अकोला), दि. १४- सिसा उदेगाव येथे दोन गटांत क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाल्याची घटना १३ मार्च रोजी रात्री घडली. या हाणामारीत तीन जण गंभीर जखमी झाले, तसेच बाहेरगावातून आलेल्या युवकांच्या दुचाक्या गावातील लोकांनी पेटवून दिल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी परस्पर तक्रारींवरून दोन्ही गटांच्या २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, २२ जणांना अटक करण्यात आली आहे. सिसा उदेगाव येथील संतोष इंगळे व गोपाल चचाणे यांच्यात धूलिवंदनच्या दिवशी शाब्दिक वाद झाला. हा वाद गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी मिटविला; परंतु रात्री १0 च्या सुमारास परत हाच वाद उफाळून आला. परत शाब्दिक वादास सुरुवात होऊन त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार काटकर यांनी घटनास्थळावर धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरा अतिरिक्त जिल्हा पोलीस विजयकांत सागर, एसडीपीओ कल्पना भराडे, ठाणेदार पी.के. काटकर आदी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. याप्रकरणी चंदन इंगळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गोपाल चचाणेसह त्याच्या सहकार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गोपाल चचाणे यांच्या फिर्यादीवरून चंदन इंगळे याच्यासह त्याच्या सहकार्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही गटांच्या परस्परांविरुद्ध तक्रारींवरून २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील २२ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सचिन सहारे, देवराव म्हैसने, चेतन दहातोंडे, दिनेश राऊत, पंकज चचाणे, उमेश शेंद्रे, कृष्णा ठाकरे, गोपाल चचाणे, मंगेश चचाणे, धनराज सहारे, उदय सहारे तसेच दुसर्या गटातील संतोष इंगळे, चंदन इंगळे, शिवाजी इंगळे आदींसह २२ जणांना अटक केली आहे.
सिसा उदेगाव येथे दोन गटांत हाणामारी
By admin | Published: March 15, 2017 2:38 AM