अकोला : कर्ज वितरणाला दीड महिना उलटून गेल्यावरही रब्बी हंगामातही बँकांनी पीक कर्ज वाटपात आखडता हात कायम ठेवल्याचे चित्र आहे. रब्बी हंगामात १७५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना केवळ ५५.४९ कोटी रुपये म्हणजे सरासरी ३१.७१ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. रब्बी हंगामात कर्जासाठी शेतकऱ्यांच्या बॅंकेच्या दारात चकरा वाढल्या आहेत. पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सूचनांना केराची टोपली दाखविली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
खरीप हंगामात पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पिकांना फटका बसला. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली असून, शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर अवलंबून आहे. रब्बी हंगामात पेरणीसाठी पैशांची अडचण भासत असल्याने शेतकरी बॅंकेत चकरा मारत आहेत. परंतु बँकांकडून कर्ज वितरण करता हात आखडताच असल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामात कर्ज वितरणाचे १७५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना दि. १८ डिसेंबरपर्यंत केवळ ३१.७१ टक्केच कर्ज वाटप झाले आहे.
शेतकरी आर्थिक अडचणीत
यंदा मान्सून उशिराने दाखल झाल्याने पेरण्या लांबल्या. त्यानंतर शेतात पीक डोलत असताना अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तसेच जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन फुलधारणेच्या अवस्थेत असताना तब्बल दीड महिना पावसाने दडी मारल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यात बाजार समितीत दर नसल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघाला नसल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत असून, कर्ज वितरण प्रक्रिया वेगाने राबविण्याची मागणी होत आहे.
४ हजार ५७९ शेतकऱ्यांना कर्जाचे वाटपजिल्ह्यात रब्बी हंगामात कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. रब्बी हंगामात ९ हजार शेतकऱ्यांना १७५ कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दीष्ट आहे, त्यापैकी ४ हजार ५७९ शेतकऱ्यांना ५५.४९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. खरीप हंगामाच कर्ज वितरण चांगले झाले असून, तब्बल सरासरीच्या ९२.२५ टक्के कर्ज वाटप झाले आहे.