लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मंगळवारी इंग्लड आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर दक्षता नगर संकुलमधील कृष्णा पान अॅण्ड कोल्ड्रिंक्स या प्रतिष्ठानामध्ये सट्टा बाजार चालविण्यात येत असताना खदान पोलिसांनी रात्री उशिरा धाड टाकून चौघांना अटक केली. या ठिकाणावरून एक सट्टा माफिया फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भारत-पाक सामन्यासह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळल्या जाणाऱ्या सामन्यावर मोठा सट्टा लावण्यात येत असल्याचे ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.दक्षता नगर संकुलमधील कृष्णा पान अॅण्ड कोल्ड्रिंक्स या प्रतिष्ठानामध्ये इंग्लड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांना मिळाली. त्यांनी सामना सुरू झाल्यानंतर ते अखेरपर्यंत या माहितीची पडताळणी करीत सट्टा चालविणाऱ्या प्रतिष्ठानावर छापा टाकला. त्यानंतर या ठिकाणावरून चार सट्टा माफियांना ताब्यात घेण्यात आले असून, यामध्ये सिंधी कॅम्पमधील रहिवासी संतोष आत्माराम मनवानी, महेश दयाराम अमरनानी, विक्की श्यामसुंदर गोस्वामी आणि अविनाश राजेश मेंगे या चार सट्टा माफियांचा समावेश आहे. या प्रतिष्ठानातून पोलिसांनी १२ हजार रोख, तीन मोबाइल, टीव्ही, सेट अप बाक्ससह ३० हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात गणेश उज्जैनकर, किशोर सोनेने, सागर भास्कर, रघुनाथ नेमाडे व प्रसाद सोगासने यांनी केली.सट्टा माफियांचे वाशिम कनेक्शनसिंधी कॅम्पमधून अटक करण्यात आलेल्या सट्टा माफियांचे वाशिममध्ये कनेक्शन असल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी सदर प्रकरणाच्या खोलात गेल्यास सट्टा माफियांची मोठी साखळीच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार आहे. ५० च्यावर सट्टा माफिया जिल्ह्यात सक्रिय असल्याचे ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर पहिल्याच कारवाईत चार सट्टा माफियांना अटक करण्यात आली असून, एक माफिया फरार झाला आहे.
क्रिकेटच्या सट्ट्यावर धाड
By admin | Published: June 08, 2017 1:39 AM