- सचिन राऊत
अकोला: जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत, त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या जननी-२ च्या कार्यक्रमानंतरही जिल्ह्यात महिला व युवतींवर अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. २०१७ या वर्षात ६९ तर १० महिन्यात ५२ बलात्कार तथा विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या, तर यावर्षीच्या केवळ १० महिन्यात तब्बल ७८ बलात्कार अन् विनयभंगाच्या घटना घडल्याने महिलांवर अत्याचाराने कळस गाठल्याचे दिसून येत आहे.जिल्हा पोलीस प्रशासनाच्या आकडेवारीनुसार बलात्कार व विनयभंगाच्या घटनांसह महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतेच आहे. गत पाच वर्षांच्या आकडेवारीची तुलना केली तर यामध्ये २०१८ च्या महिन्यांच्या कालावधीतच अधिक बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. या आकडेवारीनुसार २०१३ मध्ये ४६ बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या, तर २०१४ मध्ये या घटनांची आकडेवारी ५३ होती. त्यानंतर २०१५ मध्ये महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यात यश आल्याने केवळ ४४ बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. हेच प्रमाण २०१६ मध्ये झपाट्याने वाढून जिल्ह्यातील महिला व मुलींवरील अत्याचाराच्या तब्बल ७० घटना घडल्या होत्या. २०१७ मध्ये ६९ गुन्हे घडले तर त्यानंतर २०१८ च्या केवळ १० महिन्यांच्या कालावधीत ७८ बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडल्याने यामध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. अकोलापोलिसांकडून जननी-२ हा महिलांवरील अत्याचार आणि छळवणुकीचे प्रकार कमी करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे; मात्र त्यानंतरही महिला व मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतेच असल्याने पोलिसांचे प्रयत्न असफल ठरत असल्याचे वास्तव आहे. जनजागृती वाढल्याने गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ‘गुड टच आणि बॅड टच’ या घोषवाक्याद्वारे अकोला पोलिसांनी प्रत्येक शाळा-महाविद्यालय तसेच विविध शासकीय कार्यालयासह बँकांमध्ये ‘गुड टच बॅड टच’ या विषयावर जनजागृती केली. त्यामुळे महिला व मुलींमध्ये जागृती होऊन त्यांनी हे अत्याचार गप राहून सहन न करता त्याविरोधात आवाज उठविल्याने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याची माहिती आहे. दोषसिद्धीचे प्रमाणही अधिकमहिला व मुलींवरील अत्याचार झाल्याचे प्रमाण वाढले असतानाच त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी मेहनत घेऊन दोषसिद्धीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.