शिक्षिकेने पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार एप्रिल २०२१ मध्ये शाळेत आयाेजित केलेल्या एका बैठकीत संस्थेचे अध्यक्ष शिवा मोहोड यांनी सर्वांसमोर अपमानित करून बाहेर काढले. त्यानंतर ५ मे रोजी शाळेने नोटीस पाठवली असता शिक्षिका नोटीस घेऊन वडिलांसोबत मोहोड यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी माफीनामा लिहून मागितला. त्यानंतर जून महिन्यात शाळेत जाने सुरू केले असता माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन चौधरी व मुख्याध्यापिका विजया अवताडे यांनी माफीनामा लिहून मागितला. तसेच सुटीच्या काळातील वेतन परत करण्याचे सांगितले़ या प्रकारानंतर शिक्षिका शाळेजवळ आल्या की गेटला लाॅक लावणे, रजिस्टरवर स्वाक्षरी न करू देणे, अशा प्रकारे अपमान सुरू केला़ आदिवासी समाजातील असल्याने अपमानित करण्यात येत असल्याची तक्रार शिक्षिकेने खदान पाेलीस ठाण्यात दिल्यानंतर पाेलिसांनी शिवा मोहोड, मुख्याध्यापक गजानन चौधरी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विजय अवताडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजकीय दबावातून गुन्हा दाखल
सहा महिन्यांपूर्वी दिलेल्या तक्रारीवर आता गुन्हा दाखल करण्यात आला. शिक्षिका शाळेत तब्बल ९ महिने गैरहजर हाेत्या. त्यामुळे त्यांना एवढीच विचारणा केली असता त्यांनी एप्रिल २०२१ मध्ये तक्रार केली़ त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुका सुरू हाेताच विराेधकांना पराजय जवळ दिसत असल्याने त्यांनी आपल्याविरुद्ध कट रचून ॲट्राॅसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये काहीही दाेष नसून केवळ राजकीय दबावातून आपल्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शिवा माेहाेड
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
संस्थाध्यक्ष, श्रीराम शिक्षण संस्था, अकाेला