लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांच्याविरुद्ध एका प्रकरणात मूर्तिजापूर पोलिसांनी विविध कलमान्वये १६ रोजी गुन्हा दाखल केला आहे.स्थानिक स्टेशन विभागात राहणारे राम जोशी यांना ६ एप्रिलच्या रात्री ११.१४ वाजता ९९२१२३७२७० या भ्रमणध्वनीवरून फोन आला. तेव्हा त्या फोनवरून मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांनी कार्टून कोणी काढले व ते फेसबुकवर का टाकले, याबाबत विचारणा करीत अश्लील शिवीगाळ केली. यावेळी त्यांनी राम जोशी यांना समोर येण्याबाबत म्हटले. तेव्हा राम जोशी यांनी ‘मी शिवाजी चौकात आहे,’ असे म्हटल्यावर मुख्याधिकारी डोल्हारकर यांनी शिवीगाळ करून ‘चौकात थांब, आता येतो,’ असे म्हटले व ते ५ ते १० मिनिटांत दुचाकी गाडी घेऊन आले. त्यांनी दुचाकी जोशी यांच्या अंगावर आणून लोखंडी फायटरने मारून जखमी केले. अशी फिर्याद ७ एप्रिल रोजी राम जोशी यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. या फिर्यादीची सखोल चौकशी करून ठाणेदार गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कोथळकर यांनी १६ मे रोजी कलम ३२३, २९४, ५०४, ५०६, ५०७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास मूर्तिजापूर पोलीस करीत आहेत.
मुख्याधिकारी डोलारकरविरुद्ध गुन्हा
By admin | Published: May 18, 2017 12:58 AM