अकोला: रामधन प्लॉटमधील एका किराणा दुकानाजवळील रहिवासी असलेल्या सतीश रामलाल सावजी व रामलाल लक्ष्मीनारायण सावजी या पिता-पुत्राविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात शनिवारी अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिबंधक कार्यालयाचे सहकारी अधिकारी यांच्या तक्रारीनंतर सावजी पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनी अनेकांची लाखोंनी आर्थिक पिळवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.रामधन प्लॉटमधील रहिवासी सतीश रामलाल सावजी व रामलाल लक्ष्मीनारायण सावजी हे बाप-लेक शहरातील गरीब व गरजूंना कमी व्याजदराचे आमिष देऊन त्यांचे धनादेश ताब्यात घेतल्यानंतर ५ ते १० टक्के व्याजदर लावणे, गरीब व गरजूंच्या घरावर, प्लॉटवर अवैधरीत्या ताबा मिळविणे, वाहन जप्त करणे तसेच धमक्या देऊन पठाणी वसुली करीत व्याज व चक्रीवाढ दराने व्याज लावून नागरिकांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे तालुका उपनिबंधक कार्यालयाने पडताळणी केली असता सतीश रामलाल सावजी व रामलाल लक्ष्मीनारायण सावजी या दोघांनी प्रचंड व्याजदर लावून नागरिकांकडून पैसे वसुली सुरू केल्याचे समोर आले. यासोबतच हे दोघेही अवैध सावकारी करीत असल्याचे सहकार अधिकारी डी. डब्ल्यू शिरसाट यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी योग्य तो अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पाठविल्यानंतर तसेच सतीश रामलाल सावजी व रामलाल लक्ष्मीनारायण सावजी पिता-पुत्र अवैध सावकारी करीत असल्याचे वास्तव उघड झाल्यानंतर या दोघांविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून पोलिसांनी सावजी पिता-पुत्राविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम ३९, ४१ (सी),४५ आणि ४८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत केली होती.तालुका उपनिबंधक कार्यालयाकडून सतीश रामलाल सावजी व रामलाल लक्ष्मीनारायण सावजी या दोघांविरुद्ध अवैध सावकारीची तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीच्या आधारे तसेच दस्तावेज तपासणी केल्यानंतर या दोघांविरुद्ध अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.शैलेश सपकाळठाणेदार, रामदास पेठ पोलीस स्टेशन अवैध सावकारीचा बोलबालाजिल्ह्यात अवैध सावकारीचा प्रचंड बोलबाला सुरू आहे. अनेकांनी तक्रारी केलेल्या आहेत; मात्र या तक्रारी वर्षानुवर्ष प्रलंबित राहत असल्याने अनेकांना न्याय न मिळाल्याचे वास्तव आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने तातडीने निपटारा करण्याची मागणी होत आहे.