अकाेला : गंगानगर परिसरातील रहिवासी असलेल्या, तसेच एका माेठ्या प्रतिष्ठानच्या संचालकांनी तब्बल २१ लाख रुपयांचा वस्तू व सेवा कर बुडविल्याप्रकरणी या चार जनांविरुद्ध जुने शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वस्तू व सेवाकर विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई साेमवारी रात्री उशिरा करण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास आता सुरू करण्यात आला आहे. जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगानगर येथील रहिवासी लक्ष्मीनारायण जयनारायण राठी, शकुंतला लक्ष्मीनारायण राठी, नीलेश माेहनलाल भय्या व व्यंकटराव करी या चार जणांची मे. इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड प्राेजेक्ट नावाने बांधकाम व्यवसायाची एक फर्म कार्यान्वित केली आहे. या फर्ममधून झालेल्या व्यवहाराचा वस्तू व सेवा कर भरण्याकडे त्यांनी कानाडाेळा केला. त्यांच्याकडे महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा २०१९ व केंद्रीय विक्रीकर कायदा १९५६ अंतर्गत नाेंदणी केलेली असल्यामुळे त्यांना वस्तू व सेवा कर भरणे बंधनकारक आहे. मात्र, असे असतानाही त्यांनी कर भरण्याकडे कानाडाेळा केल्याने वस्तू व सेवा कर विभागाने त्यांना वारंवार कर भरण्याच्या सूचना केल्या. मात्र, चारही व्यापाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने, तसेच तब्बल १९ लाख ८५ हजार रुपयांचा वस्तू व सेवा कर बुडविल्यामुळे या विभागाचे अरविंद इंगळे यांनी साेमवारी रात्री जुने शहर पाेलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पाेलिसांनी संबंधित चार व्यापाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र मूल्यवर्धित कायदा २००२ चे कलम ७४ २ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वस्तू व सेवा कर विभाग, तसेच पाेलिसांकडून करण्यात येणार आहे.
जीएसटीचा पहिलाच गुन्हा
वस्तू व सेवा कर बुडविल्याप्रकरणी अकाेल्यात पहिलाच गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तब्बल २० लाख रुपयांचा हा कर बुडविल्याने वस्तू व सेवा कर विभागाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास जुने शहर पाेलीस करीत आहेत.