अकोला: शहरातील रेल्वे स्थानक चौकात असलेल्या मिलाफ गार्डन रेस्टॉरन्टच्या मालकाविरुद्ध २१ लाख ८९ हजार ८४0 रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी नागपूर येथील महावितरणच्या पोलीस ठाण्यात गुरुवारी जसपालसिंग चरणसिंग नागरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. १४ ऑगस्ट रोजी बुलडाणा, अमरावती व अकोला जिल्हय़ाच्या संयुक्त भरारी पथकाने शहरातील काही हॉटेल्स व दुकानांमध्ये छापे टाकले होते. यादरम्यान त्यांना मिलाफ गार्डन रेस्टॉन्टमधील वीज मीटरमधील सील तोडून फेरफार केल्याचे लक्षात आले. आणखी चौकशी केल्यानंतर १ लाख ५२ हजार ८८३ युनिट विजेची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या युनिटप्रमाणे २१ लाख ८९ हजार ८४0 रुपयांचा फेरफार झाला असल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आले. या भरारी पथकाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी नागपूर येथील महावितरणच्या वीज चोरीसाठी असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर भारतीय वीज कायदानुसार जसपालसिंग चरणसिंग नागरा यांच्याविरुद्ध १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या वतीने भरारी पथक तसेच स्थानिक अधिकार्यांच्या वतीने धाडी टाकण्यात येत आहे. १0 व ११ ऑगस्ट रोजी स्थानिक अधिकार्यांनीही धाडी टाकून वीज चोरी करणार्यांवर कारवाई केली होती.
वीज चोरी करणा-या हॉटेल मालकावर गुन्हा
By admin | Published: August 21, 2015 1:16 AM