अकाेला : वाशिम जिल्हयातील मंगरुळपीर तालुक्यातील माळशेलू शिवारातील १५ शेतकऱ्यांना वीज जाेडणी न देता शासकीय कंत्राटदाराने केलेले काम नियमबाह्य असल्याचे सांगत वर्तमानपत्रात बातम्या छापण्याची धमकी देऊन तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पिंजर येथील महावितरण कंपनीचा सहायक अभियंता व एका दैनिकाच्या पत्रकाराविरुध्द खदान पाेलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराचा संशय आल्याने आराेपींनी लाच स्वीकारली नाही.
महावितरण कंपनीचा पिंजर येथील सहायक अभियंता संदीप उपासराव घाेडे (वय ४२, रा. काैलखेड, अकाेला) याने माळशेलू शेतशिवारात महावितरणच्या कंत्राटदाराने केलेले १.३ अंतर्गतचे डीडीएफ याेजनेतील दाेन राेहित्र उभारणीचे कामकाज हे नियमबाह्य असल्याचे सांगत १५ शेतकऱ्यांची वीज जाेडणी प्रलंबित ठेवली. यासाेबतच शासकीय कंत्राटदार आणि संबंधित लाेकसेवक यांच्याविरुध्द वर्तमानपत्रात बातमी प्रकाशित करण्याची धमकी दिली. मात्र तक्रारदाराने यावर ताेडगा काढण्याची विनंती केल्यानंतर सहायक अभियंता संदीप घाेडे याने पार्टीसाठी ५०० रुपये आणि बातमी न प्रकाशित करण्यासाठी सुनील अवचार यांच्यासह संदीप घाेडे याने स्वत:साठीही तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र तक्रारकर्त्यास लाच द्यायची नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकाेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रात्री काैलखेड चाैकात सापळा रचून आराेपींना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्याचा संशय आल्याने दाेन्ही आराेपी घटनास्थळावरून निघून गेले. त्यामुळे याप्रकरणी एसीबीने खदान पाेलिसात तक्रार दिली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती. ही कारवाइ एसीबीचे उपअधीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली इश्वर चव्हाण यांनी केली.