मूर्तिजापूर (जि. अकोला): आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) येथील कार्यालयात २३ जून रोजी एका २४ वर्षांंच्या युवतीने विष घेऊन आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी तेथील लेखापालाविरुद्ध तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतचा गुन्हा शुक्रवारी दाखल केला. माना येथील सुजाता कोकणे (२४) या युवतीने प्रेम प्रकरणातून स्थानिक शिवाजी चौकातील आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयात विष घेऊन आत्महत्या केली होती. त्या युवतीचे त्याच कार्यालयातील लेखापाल गजानन मानवटकर (५४) याच्याशी पूर्वीच सूत जुळले होते. दरम्यान, त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे सदर युवतीने मानवटकरविरोधात मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक शोषणाबाबत तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी मानवटकरविरुद्ध भादंविच्या ३७६ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतरही मानवटकरने तिला मानसिक त्रास देणे सुरूच ठेवल्याने तिने आत्महत्या केल्याच्या कारणावरून मूर्तिजापूर पोलिसांनी गजानन मानवटकरविरुद्ध भादंविच्या ३0६ व ५0६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किनाके करीत आहेत.
‘एलआयसी’तील लेखापालाविरुद्ध गुन्हा
By admin | Published: June 27, 2016 2:38 AM