अकोला-मेडशी रस्त्याचे काम सुरू असून, येथील बीएमएस कॉलेजसमोर नवीन पुलाचे निर्माण कार्य सुरू होते. दि. २१ एप्रिल २०२१ रोजी काम करताना मजुराचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात पोलिस तपासात मोंटो कार्लो कंपनीच्या कंत्राटदार व अभियंत्याने मजुरांना खड्ड्यामध्ये काम करीत असताना सुविधा पुरविल्या नाहीत, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली नाही. मजुरांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट आणि संरक्षण ड्रेसही पुरविला नसल्याची माहिती समोर आली आहे. याबरोबरच घटनास्थळी लोखंडी सळ्या उघड्या ठेवल्या. या कारणावरून मोंटो कार्लो कंपनीच्या कंत्राटदार उपेंद्रभाई वल्लभभाई पटेल (४८) (रा.साई दर्शन सोसायटी वाढिया, ता.नांदोड, जि.नर्मदा, गुजरात) व अभियंता शिवशंकर कनोजी, महावीर सिंग यांनी घटनास्थळी निष्काळजीपणा करून कोणत्याही सुविधा पुरविल्या नाहीत, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले. एएसआय हरिदास अवचार यांच्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध अपराध क्रमांक २४९ / २१ कलम ३०४ अ ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोंटो कार्लोच्या कंत्राटदार, अभियंत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:19 AM