अकोला - बनावट दस्तऐवज व खोट्या स्वाक्षरीच्या आधारे सिमकार्डची बेकायदेशीर विक्री करणार्या जुने शहरातील डाबकी रोडवरील एवन मोबाइलच्या संचालकासह अँक्टीव्हेशन अधिकारी व अज्ञात सिमकार्डधारकाविरुद्ध डाबकी रोड पोलिसांनी बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. एवन मोबाइल दुकानाचा संचालक मोहम्मद आरीफ याने डाबकी रोडवरील रहिवासी आनंद ताले यांच्या दस्तऐवजांचा वापर करून व त्यांची बनावट स्वाक्षरी करीत युनिनॉर कंपनीच्या सीमकार्डची बेकायदेशीर विक्री केली. त्यानंतर युनिनॉर कंपनीचा अँक्टीव्हेशन अधिकार्याने सदर सिमकार्ड अँक्टीव्ह केले व हे सिमकार्ड वापरणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध आनंद ताले यांनी तक्रार दिली असून, या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी सदर तीनही आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२0, ४६८, ४७१ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अन्य व्यक्तीच्या दस्तऐवजांचा वापर करीत त्यावर खोट्या स्वाक्षरी करून सिमकार्डची विक्री करण्यात येत असून, या सिमकार्डचा वापर दहशतवाद किंवा मुलींच्या छेडखानीसारख्या घटनांमध्ये होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे दहशतवादविरोधी सेलने सिमकार्डची अशाप्रकारे बेकायदेशीर विक्री करणार्यांवर कारवाईचा सपाटा सुरू केला. बोगस सिमकार्ड वापरणार्यांची पडताळणीच या सेलने सुरू केली असून, आतापर्यंत १५ च्यावर बोगस सिमकार्डधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोगस सिमकार्डची विक्री करणा-या तिघांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: October 08, 2015 1:46 AM