अकोला : शहरात घडलेल्या एका हत्याकांड प्रकरणातील आरोपीस सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर आरोपीला भेटण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पत्नीचा व्हिडीओ काढणाऱ्या दुचाकीचालक युवकाविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रहिवासी एका ६० वर्षीय व्यक्तीची आठ ते दहाजणांनी हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली. यामधील एका आरोपीची प्रकृती बिघडल्याने त्याला गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आरोपी पतीला भेटण्यासाठी त्यांची पत्नी रुग्णालयात गेली असता, (एमएच ३० बीजे १६९१) या दुचाकी चालकाने या महिलेचा व्हिडिओ काढला. त्यामुळे महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी (एमएच ३० बीजे १६९१) या दुचाकी चालकाविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ व माहिती तंत्रज्ञान सुधारणा अधिनियम कायदा २००८ च्या कलम ६६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती आहे.