अकोला: अकोलेकरांच्या सहकार्यामुळेच गुन्हेगारीवी नियंत्रण मिळवता आले असे प्रतिपादन मावळते जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी सोमवारी केले.मीणा यांची नांदेड येथे बदली झाली. सोमवारी त्यांना पोलीस दलाच्या वतीने सत्कार करण्यात आला. पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची जीप ओढून त्यांचा सन्मान केला. सोमवारी चंद्रकिशोर मीणा यांचा सत्कार करण्यासाठी पोलीस मुख्यालयात समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. तीन वर्षांपूर्वी अकोल्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढलेला होता; परंतु येथे पोलीस अधीक्षकाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपण शहरात एकही दंगल होऊ देणार नाही, असा शब्द दिला होता. तो आपण पाळला. तीन वर्षांमध्ये शहरात एकही दंगल झाली नाही. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. यासाठी अकोलेकरांसोबतच अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. पोलीस लॉन्स उभे राहिले. ही माझ्यासाठी मोठी उपलब्धी आहे, असे मनोगत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी मांडले.मीणा यांनी त्यांच्या कार्यकाळात यासोबतच त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वाढदिवसाची सुटीसारखा उपक्रम राबविला. त्यांच्या जागेवर नवे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर हे रुजू होणार आहेत.सत्कार कार्यक्रमाला अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक प्रमोद काळे, पोलीस निरीक्षक देवराज खंडेराव, सिव्हिल लाइनचे ठाणेदार अन्वर शेख, कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे, जुने शहरचे ठाणेदार रियाज शेख, एमआयडीसीचे ठाणेदार किशोर शेळके, अकोट फैलचे ठाणेदार तिरुपती राणे, रामदासपेठचे ठाणेदार शिरीष खंडारे, पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, सहायक पोलीस निरीक्षक भारसाकळे, सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्यासह सर्वच ठाण्यांमधील पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
अकोलेकरांच्या सहकार्यामुळेच गुन्हेगारीवर नियंत्रण - मीणा
By admin | Published: May 02, 2017 1:13 AM