अकोला : राज्य शासनाने कोरोना संक्रमणाचा वेग कमी करण्यासाठी कडक संचारबंदी लागू केली आहे; मात्र शहरात संचारबंदीचे काही जण पालन करीत नसल्याच्या माहितीवरून शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाने सरकारी बगिच्या ते जिल्हाधिकारी कार्यालय रोडवर विनाकारण फिरणाऱ्या ५० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीचे कोणीही पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत प्रचंड गर्दी असल्याने कोरोनाचा वेग आणखी वाढत आहे. राज्य शासनाने कोरोनाचा वेग कमी करण्यासाठी कडक संचारबंदी लागू केली आहे. सोबतच आंतरजिल्हा बंदीही करण्यात आली आहे; मात्र तरीही बाजारपेठ खुलेआम सुरू असल्याने तसेच विनाकारण फिरणाऱ्यांचा मोठा वावर शहरात असल्याने शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय ते सरकारी बगिच्या या रोडवर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. या दरम्यान तब्बल ५० जणांविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम आता सुरूच राहणार असल्याने कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनी केले आहे; मात्र विनाकारण घराबाहेर निघाल तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.