युवा माेर्चाच्या जनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने ते अकाेल्यात आले हाेते. यावेळी त्यांनी विश्रामभवनात पत्रकारांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी हे सुडाचे राजकारण करत आहे. नारायण राणे यांच्या अटकेच्या निमित्ताने ही बाब अधाेरेखित झाली आहे. सेनेने अशा राजकारणाची सुरुवात करून राजकीय संस्कृतीलाच धक्का लावला आहे. ते बाेलतात तेव्हा ठाकरी भाषा अन् इतरांनी तसे वक्तव्य केल्यास अवमान असा उफराटा न्याय कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राणेंवर लावण्यात आलेली कलमे ही न्यायालयात टिकणार नाहीत, ती रद्द हाेतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर, आ. गाेवर्धन शर्मा, आ. हरीश पिंपळे, भाजयुमाेचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, महापाैर अर्चना मसने, विजय अग्रवाल, किशाेर मांगटे, गिरीश जाेशी आदी उपस्थित हाेते.
महाविकास आघाडीमुळे ओबीसी आरक्षण रद्द
भाजपची सत्ता असताना ओबीसी आरक्षणासाठी वटहुकूम काढून हे आरक्षण कायम ठेवले हाेते. मात्र, महाविकास आघाडीने हा वटहुकूम रद्द केलाच, साेबतच न्यायालयात उत्तर दाखल करण्यातही चालढकल केली. न्यायालयात ओबीसी आरक्षण कसे याेग्य आहे, हे पटवून सांगण्यात सरकारला अपयश आले असून त्यामुळे आरक्षण रद्द झाले आहे, असा आराेप बावनकुळे यांनी केला. ओबीसींचा डाटा गाेळा करण्यासाठी ओबीसी आयाेगाला ४३५ काेटी रुपये व मनुष्यबळ हवे आहे. याबाबत २८ जुलै २०२१ राेजी आयाेगाने दिलेला प्रस्तावही महाविकास आघाडीने मान्य केलेला नाही. यावरून आरक्षण न देण्याची या सरकारची मानसिकता असल्याचे स्प्ष्ट हाेते, असा आराेपही त्यांनी केला.
शिवसेना आमदाराचे वक्तव्य तपासणार
शिवसेनेने मंगळवारी केलेल्या आंदाेलनादरम्यान सेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी नारायण राणे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली आहेत. याबाबत सदर विधाने तपासून रीतसरपणे कायदेशीर सल्ला घेण्यात आल्यावर कारवाई केली जाईल, त्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर पुढाकार घेतील, असे बावनकुळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.