अकोला: गरजू लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांची पिळवणूक करून गैरमार्गाने अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या व्याळा येथील अवैध सावकारासह शहरातील नऊ अवैध सावकारांविरुद्ध मंगळवारी रात्री बाळापूर, खदान, रामदासपेठ, जुने शहर, डाबकी रोड पोलिसांनी गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे, मीरा दयाराम फुलवानी हिच्यासह तिच्या कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.व्याळा येथील सचिन त्र्यंबक वानखडे, शहरातील रामदासपेठमधील पूर्वा हाइट्समध्ये राहणारा श्यामकुमार सुंदरलाल लोहिया, डाबकी रोडस्थित गणेश नगरमधील डॉ. गणेश शिवराम मेहरे, निमवाडीमधील नानक नगरमध्ये राहणारी मीरा दयाराम फुलवानी, वाशिम रोड बायपास येथील गजानन शालीग्राम शिरसाट यांच्याविरुद्ध जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींनुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांच्या पाच पथकांनी २८ डिसेंबर रोजी छापे टाकले होते. या छाप्यांमध्ये या सर्व अवैध सावकारांच्या घरातून रोख १ लाख ३९ हजार ७२० रुपये, १०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि लाखो रुपयांच्या अवैध सावकारी व्यवहाराचे दस्तऐवज जप्त करण्यात आले होते. या सर्व अवैध सावकारांविरुद्ध उपनिबंधक कार्यालयातील सहकारी अधिकारी दीपक सिरसाट, मुख्य लिपिक जयंत सहारे, सहायक निबंधक सहकारी संस्था बाळापूरचे भास्करराव कुळकर्णी यांनी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी रात्री सर्व अवैध सावकारांविरुद्ध सावकारी अधिनियम २0१४ नुसार कलम ३९, ४१ (सी), ४५, ४८ नुसार गुन्हा दाखल केला.अख्खे कुटुंबच अवैध सावकार!निमवाडीतील नानक नगरातील अवैध सावकार मीरा दयाराम फुलवानी हिच्या घरी जिल्हा उपनिबंधक पथकाने छापा टाकला, तेव्हा तिच्या घरी लाखो रुपयांच्या अवैध व्यवहाराचे दस्तऐवज आढळून आले. एवढेच नाही, तर तिच्या कुटुंबातील सर्वच जण अवैध सावकारीचा व्यवसाय करीत असल्याचे उघड झाले. उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपिक जयंत सहारे यांच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी मीरा दयाराम फुलवानी, कमल दयाराम फुलवानी, मनीष दयाराम फुलवानी, दयाराम किशनचंद फुलवानी, पूजा कमल फुलवानी, निकिता मनीष फुलवानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अवैध सावकारांकडून जप्त केलेला मुद्देमालअवैध सावकार श्यामकुमार लोहिया याच्या घरातून अवैध सावकारी व्यवहाराचे ६७ खरेदी खते व विक्री पावती, पाच मुखत्यारपत्र, १०० व ५०० रुपयांचे कोरे बॉण्ड, १ समझोता लेख, १ इसार पावती, ४ ताबा पावती, १ टोकन पावती, २८ सात-बारा व फेरफार, डॉ. गणेश मेहरे याच्या घरातून ११५ खरेदीखते, ३८ कोरे बॉण्ड, २३ इसार पावती, ९३ धनादेश, २२ ठोका पावत्या, ४ नोंदी रजिस्टर, ४ बँक पासबुक, सोनाराला व्याजाने पैसे दिल्याच्या ५५ पावत्या, १ करारनामा, वाहनाचे १ आरसी बुक, मीरा फुलवाणी याच्या घरातून ६ इसार पावत्या, १२ कोरे धनादेश, ४ नोंदी रजिस्टर, वाहनांचे ३ आरसी बुक, १ लाख ४ हजार ५२० रुपये रोख रक्कम, १०० ग्रॅम सोन्याचे दागिने. सचिन त्र्यंबक वानखडे यांच्या घरातून १ कोरा बॉण्ड, तर गजानन शिरसाट यांच्या घरातून ४ कोरे बॉण्ड, ७ कोरे धनादेश, १ नोंदी रजिस्टर व ३५ हजार २०० रुपये रोख रक्कम आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.