- सचिन राऊतअकोला : शासनाच्या अखत्यारीतील तब्बल २० कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्यात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी भूमी अभिलेख विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच कट रचणा-या व्यक्तीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. भूखंड हडपण्याचा प्रयत्न करणारे हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले होते, हे विशेष.शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/ ‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून तब्बल २० कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नाही. तरीही तालुका भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात आॅनलाइन नोंद घेऊन हा भूखंड कागदोपत्री हडपण्यात आला. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले तसेच पाठपुरावा केला.भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश कुळकर्णी यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी-कर्मचारी व हा भूखंड हडप करणारा २० कोटी रुपयांचा लाभार्थी यांच्याविरुद्ध फसवणूक, कट रचण्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.लोकमतने या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानंतर भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बी. डी. काळे यांनी तीन कर्मचाºयांना निलंबित केले. एका कर्मचाºयाची विभागीय चौकशी सुरू केली आहे, तर शिवाजी काळे यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार आहे. भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक अजय कुळकर्णी व उपअधीक्षक योगेश कुळकर्णी यांच्यावरही या प्रकरणात दिरंगाईचा ठपका ठेवण्यात आला आहे.भूखंड घोटाळ्यामध्ये सध्या अज्ञात अधिकारी-कर्मचारी व कट रचणाºया बाहेरील व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच संबंधित आरोपींना बेड्या ठोकण्यात येतील.- गणेश अणे, प्रमुख, आर्थिक गुन्हे शाखा, अकोला
भूखंड घोटाळ्यात फौजदारी कारवाई, अधिकारी-कर्मचा-यांविरुद्ध गुन्हा, ‘लोकमत’चा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 4:59 AM