अकोला : शहरात २४ जून रोजी घडलेल्या हत्याकांड प्रकरणातील सात आरोपींना शनिवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी गवळीपुर्यातील २00 ते ३00 संख्येतील जमाव न्यायालयाच्या आवारात पोहोचला. आरोपीविरूद्ध नारेबाजी करीत जमावाने आरोपी असलेल्या पोलिस व्हॅनवर दगडफेक सुरू केली. दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केला. २४ जून रोजी आर्थिक देवाण-घेवाणच्या वादातून शेख अक्रम, शेख सलीम, शेख महबूब, शेख अली व महबूब खान यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. उपचारादरम्यान जखमी शेख अक्रम याचा मृत्यू झाला. शेख सलीम यांच्या तक्रारीनुसार, रामदासपेठ पोलिसांनी माजी नगरसेवक शेख फरीद शेख करीम यांच्यासह शेख साजिद शेख सुलतान, शेख सुलतान शेख यासीन, शेख रशीद शेख सुलतान, शेख आरिफ शेख आमद, शेख नईम शेख गफूर, शेख रहीम शेख गफूर या सात आरोपींना अटक केली. पोलिसांनी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास आरोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी गवळीपुर्यातील २00 ते ३00 जणांचा जमाव न्यायालय परिसरात गोळा झाला. जमावाने आरोपींविरुद्ध नारेबाजी सुरू केली. मृतकचा भाऊ मोहम्मद मसूद याने जमावाला भडकविल्याने, जमावाने पोलिस व्हॅनवर दगडफेक केली. त्यामुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. दगडफेकीत संतोष गवई नामक पोलिस कर्मचारी जखमी झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज करून जमावाला न्यायालयाच्या बाहेर काढले.
न्यायालयात जमावाची पोलिस व्हॅनवर दगडफेक
By admin | Published: July 06, 2014 12:26 AM