वरूर जऊळका: अकोट तालुक्यातील वरूर जऊळका, लोतखेड, खापरवाडी बु. व खुर्द, सावरगाव, विटाळी आदी गावातील शेतकऱ्यांच्या ९० टक्के पेरण्या आटोपल्या असून, येत्या आठ दिवसात पाऊस न आल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते. दुसरीकडे शेतमजुरांच्या हाताला कामे नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी या भागामध्ये पाऊस आला तो नसल्यागतच झालेला आहे; परंतु वेळ होत असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी कमी पावसावरच पेरण्या केलेल्या आहेत. हवामान खात्याने व भेंडवळ मांडणीमध्ये १०० टक्के पाऊस सांगितल्याने यावर्षी या भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. तसेच या भाकितामुळे शेतीच्या लागवडीचे भाव वाढलेले होते. यावर शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा होऊन लागवडीचे भाव वाढलेले असून पेरण्या केलेल्या आहेत. पेरण्या झालेल्या शेतामधील बीजे अंकुरलेली आहेत. अंकुरलेल्या बीजांना शेतकरी डवरणी देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील वर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यावर पिकेसुद्धा चांगली झाली; परंतु यावर्षी मृग नक्षत्राला एक महिन्याचा अवधी होत आला असून, पावसाने दांडी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी पेरलेली आहे. शेतकऱ्यांनी महाग बियाणे खरेदी करून मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पिके चांगली येणार, या आशेवर पेरण्या आटोपून घेतल्या; परंतु पावसाने थांबा दिल्याने दुबार पेरणीला सामोरे जावे लगणार की काय, या विवंचनेत शेतकरी पडला आहे. मजुरांना मजुरी नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे. पाऊस येण्यासाठी शेतकरी वरुणराजाला प्रसन्न होण्यासाठी विनवणी करीत आहेत. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेतयंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीलाच चांगला पाउस पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली; मात्र गेल्या २० ते २२ दिवसांपासून आलेगाव परिसरात दीर्घ दांडी मारल्यामुळे हलक्या रानातील काही पिके पाण्याअभावी संकटात आली आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.मागील तीन वर्षांपासून नापिकीमुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात आहे.यावर्षी ९ जून रोजी परिसरात दमदार पाऊस पडल्याने १३ जूनपासून काही शेतकऱ्यांनी कपाशी, उडीद व सोयाबीन पेरणीस सुरुवात केली. त्यांच्या शेतात बीज अंकुरले होते. नंतर १० ते १२ दिवस कडक उन्ह तापत गेल्याने राहिलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीला ब्रेक दिला. २६ जून रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. यामुळे शेतकऱ्यांनी आता पाऊस येणारच या आशेवर उरलेली पेरणी केली; मात्र सध्या पावसाने दांडी मारल्यामुळे पेरण्या उलटतात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. पावसाचे प्रमाण कमी असले की पिके तग धरू शकत नाहीत. त्यामुळे उत्पादनाची टक्केवारी घटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. म्हातोडी परिसरात पावसाची प्रतीक्षापरिसरात पावसाने दगा दिल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, शेतकरी चिंतातुर झाला आहे. यावर्षी पावसाची चांगली सुरुवात झाली व शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले. त्यामुळे, शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहे.म्हातोडी परिसरात म्हातोडी, कासली, दोनवाडा, लाखोंडा बु., लाखोंडा खु., घुसरवाडी येथील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे.
दुबार पेरणीचे संकट
By admin | Published: July 10, 2017 2:15 AM