अकोला : अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात गत चार दिवसात जिल्ह्यातील चार तालुक्यात ४ हजार ७७० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोमवारी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.
जिल्ह्यात विविध भागात १७,१८, १९ व २० मार्च रोजी या चार दिवसाच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात कांदा,गहू, हरभरा, लिंबू, पपई, आंबा, भाजीपाला व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसानाचा प्राथमिक अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिला होता. जिल्ह्यातील बार्शिटाकळी, मूर्तिजापूर, अकोट व पातूर या चार तालुक्यातील ३५ गावात ४ हजार ७७० हेक्टर ३४ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोमवारी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.
चार तालुक्यात गावनिहाय असे आहे पिकांचे नुकसान !
तालुका गावे क्षेत्र (हेक्टर)
बार्शिटाकळी ०३ ११.८२
मूर्तिजापूर ०५ ११३.१०
अकोट १५ ४०५०.००
पातूर १२ ५९५.४२
..................................................................................
एकूण ३५ ४७७०.३४
पाचव्या दिवशीही जिल्ह्यात अवकाळी पाऊस !
जिल्ह्यात गत चार दिवसात जिल्ह्यातील अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाचव्या दिवशीही सोमवारी पहाटे जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.