- संतोष येलकर
अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेतीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडला असतानाच, प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढलेल्या १ लाख ९० हजार ५२४ शेतकऱ्यांपैकी शनिवारपर्यंत केवळ २२ हजार ९२९ शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचे तक्रार अर्ज पीक विमा कंपनीकडे सादर करण्यात आले. त्यामुळे पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईचा लाभ मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात २१ जुलै रोजी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नदी व नाल्यांना पूर आला. अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिके पाण्यात बुडाल्याने, शेतकरी संकटात सापडला. दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात विहीत मुदतीत जिल्ह्यातील १ लाख ९० हजार ५२४ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला. पीक विम्याच्या लाभासाठी पिकांचे नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या मुदतीत पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून पीक नुकसानाची सूचना किंवा तक्रार अर्ज संबंधित विमा कंपनीकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर विमा कंपनी, कृषी विभाग व महसूल विभागामार्फत जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीसंदर्भात अर्ज घेण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी ३१ जुलैपर्यंत केवळ २२ हजार ९२९ शेतकऱ्यांचे पीक नुकसानाचे अर्ज पीक विमा कंपनीकडे सादर करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी किती शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईचा लाभ मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विमा काढलेले शेतकरी आणि पीक
नुकसानीच्या अर्जांची अशी आहे संख्या!
तालुका शेतकरी अर्ज
अकोला ४२०८४ ८७१०
बार्शीटाकळी २०२७३ ३१८५
मूर्तिजापूर ३१२६३ २२८९
अकोट ३०४७४ ८००
तेल्हारा २००८४ १७४२
बाळापूर ३२८५२ ५३७३
पातूर १३५३४ ३०
.........................................................................
एकूण १९०५२४ २२९२९
प्राथमिक अहवालानुसार ७५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पंचनामे सुरू!
अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात ७५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या पथकांमार्फत सुरू आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कांतप्पा खोत यांनी सांगितले.
अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून पीक नुकसानीसंदर्भात सूचना अर्ज विमा कंपनी, कृषी विभाग व महसूल विभागामार्फत स्वीकारण्यात आले. विमा काढलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत २२ हजार ९२९ शेतकऱ्यांचे सूचना अर्ज प्राप्त झाले असून ते संबंधित विमा कंपनीकडे सादर करण्यात आले.
-संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.