अकोला : रब्बी हंगामात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान होऊनही पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात तुटपुंजी मदत जमा केली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दि.५ जूलै रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, रब्बी हंगामातील हरभरा, गहू या पिकांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. यासंदर्भात शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. तक्रारीनुसार पीक विमा कंपनीच्या प्रतिनीधींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची टक्केवारी न टाकता केवळ पंचनामा करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनातून केला आहे. आता नुकसानाची भरपाई म्हणून केवळ तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. कुठलेही नियम व निकष न लावता शेतकऱ्यांच्या खात्यात २५ ते ३० हजार रुपये जमा करावे, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी तक्रार करूनही पंचनामे झाले नाहीत, त्यांचे नुकसान ग्राह्य धरून तत्काळ मदत द्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, संजय सोनोने, नीतीन गावंडे, गणेश ढोरे, राहूल गुल्हाणे, अशोक गुल्हाणे, हर्षद गावंडे, गोपाल पाठक, जीतेंद्र बोबडे, प्रवीण ठाकरे, शैलेज तायडे, सुरेश काळे आदींसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.