लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील अकोला तालुक्यात म्हैसपूर, कापशी तलाव, गोरेगाव खुर्द, बाळापूर तालुक्यातील भरतपूर, नकाशी व वाडेगाव या सहा गावांना भेटी देऊन केंद्रीय पथकाने शनिवारी पीक नुकसानाची पाहणी केली. पिके चांगली होती, त्यामुळे यंदा पिकांचं उत्पादन चांगलं होण्याची अपेक्षा होती; मात्र अवकाळी पावसाच्या तडाख्यात काहीच नाही राहिलं; सगळं ‘अवकाळी’ने पळविलं, अशी व्यथा पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकापुढे मांडली.पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेल्या खरीप पिकांसह भाजीपाला आणि फळ पिकांचे नुकसान झाल्याने, शेतकरी हवालदिल झाला. त्यानुषंगाने केंद्रीय पथक प्रमुख आर. के.सिंग यांच्यासह अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी अकोला तालुक्यातील म्हैसपूर, कापशी तलाव, गोरेगाव खुर्द व बाळापूर तालुक्यातील भरतपूर, नकाशी व वाडेगाव या सहा गावांना भेटी देत, शेतातील पीक नुकसानाची पाहणी केली.पिकांच्या नुकसान झालेल्या संबंधित शेतकºयांसोबत चर्चा करून पीक नुकसानाची माहिती घेतली. त्यामध्ये म्हैसपूर येथे ज्वारी व सोयाबीन पीक नुकसानाची पाहणी केंद्रीय पथकाने केली. अवकाळी पावसाच्या तडाख्यात काळीभोर झालेली ज्वारी सडली, सोयाबीन सडले व कपाशीच्या बोंड्या सडल्या असून, पिकांचे काहीच राहिले नाही, असे शेतकरी गजानन अघडते यांनी केंद्रीय पथकाच्या अधिकाºयांना सांगितले.यंदा पीक चांगले होते, त्यामुळे पिकांचे उत्पादन चांगले होण्याची आशा होती; परंतु हाताशी आलेल्या सर्वच पिकांचे उत्पादन अवकाळी पावसाने पळविले, अशी व्यथा कापशी तलाव येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी विठ्ठल बिल्लेवार यांनी केंद्रीय पथकापुढे मांडली. यावेळी केंद्रीय पथकासमवेत अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे यांच्यासह संबंधित तलाठी व कृषी सहायक उपस्थित होते.शेतकºयाने दाखविले सोयाबीनचे सडलेले दाणे!म्हैसपूर येथील पीक नुकसानाच्या पाहणीदरम्यान अवकाळी पावसाने सोयाबीन पिकाच्या नुकसानाची माहिती देत, शेतकरी संजय अघडते यांनी सोयाबीनच्या शेंगांमधील सडलेले सोयाबीनचे दाणे काढून केंद्रीय पथकाला दाखविले. त्यानुषंगाने सडलेल्या सोयाबीनची पाहणी पथकाने केली.
पीक नुकसानाच्या पंचनाम्याची प्रत मागितली!म्हैसपूर येथे ज्वारी पिकाच्या नुकसानाची पाहणी करताना, संबंधित शेतातील पीक नुकसानाचा पंचनामा करण्यात आला का, केव्हा केला, यासंदर्भात विचारणा करीत पीक नुकसानाच्या पंचनाम्याची प्रत केंद्रीय पथकाने मागितली. त्यानुसार संबंधित कर्मचाºयांनी पीक नुकसानाच्या पंचनाम्याची प्रत पथकाला दाखविली.
लिंबू, पपईचा बहर झडला!केंद्रीय पथकाने कापशी तलाव शिवारातील पुरुषोत्तम चतरकर व प्रकाश चतरकर यांच्या लिंबू व पपई बागेची पाहणी करीत नुकसानाची माहिती घेतली. अवकाळी पावसाच्या तडाख्यात मृग व हस्त बहर झडल्याने लिंबू पिकाचे आणि दुसरा बहर झडल्याने पपई पिकाचे उत्पादन बुडाल्याची व्यथा शेतकºयांनी केंद्रीय पथकापुढे मांडली.
पीक विम्याचा लाभ द्या!पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकºयांना पीक विमाच्या लाभ आणि सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी गोरेगाव येथील शेतकरी संतोष वाकोडे यांच्यासह शेतकºयांनी पथकाकडे केली.
सरपंच, पोलीस पाटलाकडून घेतली नुकसानाची माहिती!कापशी रोड येथे गणेश चतरकर यांच्या शेतात कापूस पीक नुकसानाची पाहणी केंद्रीय पथकाने केली. पीक नुकसानासंदर्भात कापूस उत्पादक शेतकºयासोबत चर्चा करून, पीक नुकसानाच्या पंचनाम्याची माहिती संबंधित सरपंच व पोलीस पाटील यांच्याकडून घेतली.