अकोला: पावसामुळे उभ्या पिकांचे तसेच काढणी पश्चात तयार न झालेल्या पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक शेतकऱ्यांचे पंचनामे करावे, सोबत पीक नुकसानीचा सूचना फॉर्म भरून ४८ तासांच्या आत प्रधानमंत्री पीक विमा योजना काढलेल्या शेतकºयांनी विमा कंपनीच्या मेल आयडीवर पाठवण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी आधीच दिले आहेत. दरम्यान, याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी सर्व संबंधितांना कळवण्यात आले आहे.राज्यात सर्वत्र १८ आॅक्टोबरपासून अवकाळी पाऊस पडत आहे. त्या पावसामुळे उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामध्ये कापूस, तूर, सोयाबीनचा समावेश आहे. तसेच सोयाबीनचे काढणी पश्चात मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या सर्व बाबी पाहता विमा कंपनीला नुकसान भरपाईसाठी ४८ तासांच्या आत माहिती देणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभागाला तातडीने पंचनामे करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, त्यासाठी प्रत्येक शेतकºयांच्या शेतात जाऊन पंचनामा होणार आहे. नैसर्गिक आपत्ती बाबीअंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, वीज कोसळून लागणारी आग, या आपत्तींमध्ये नुकसाग्रस्त क्षेत्राचे वैयक्तिक पंचनामे करावे लागतात. तर काढणी पश्चात नुकसानीसाठी ज्या पिकांचे काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते. सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्याच्या आत १४ दिवसात गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेल्या पावसामुळे नुकसान झाल्यास त्याचेही वैयक्तिक पातळीवर पंचनामे केले जातात. पंचनाम्यातून पुढे आलेल्या माहितीनुसार पीक नुकसान सूचना फॉर्म भरून वीमा कंपनीच्या अधिकृत मेलवर टाकावा लागणार आहे. याबाबत शेतकºयांमध्ये जनजागृती करावी, तसेच नमुना अर्ज द्यावा, असेही निर्देश देण्यात आले. शेतकºयांनी कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचेही सांगण्यात आले.