संतोषकुमार गवई
पातूर: तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली. सद्यस्थितीत पिके बहरली आहेत; मात्र गत आठवडाभरापासून पाऊस नसल्याने पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. आणखी चार ते पाच दिवस पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. सध्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. ग्रामीण भागात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. दरम्यान, पिके उमलली असून, पिकांना पाण्याची गरज आहे. अशातच पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. (फोटो)
-------------------------
तालुक्यात सोयाबीनचा पेरा अधिक
यावर्षी तालुक्यात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. कपाशीसह इतर पिकांचे क्षेत्र घटणार असल्याचे चित्र आहे. तालुक्यात यंदा ४२ हजार ५७० हेक्टर क्षेत्र वहितीखाली असून, सोयाबीनची पेरणी २५ हजार ५०० हेक्टर, कपाशी आठ हजार ४४५ हेक्टर, तूर सात हजार ५०० हेक्टर, उडीद १३ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन तालुका कृषी विभागाने केले आहे.
----------------------------
सस्ती, बाभूळगाव परिसरातील पिके धोक्यात!
पातूर तालुक्यातील आलेगाव आणि पातूर मंडळ वगळता चान्नी, सस्ती व बाभूळगाव मंडळातील क्षेत्रामध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. पावसाच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे; मात्र पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात सापडली आहेत.
---------------------------
शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे!
पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढविण्याची शक्यता आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पाणी देत आहेत. सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
--------------------------
प्रारंभी पावसाने जोरदार हजेरी लावली होती, त्याच भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरणी आटोपली. गेल्या तीन वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी आधीच गारद झाला आहे. पावसाअभावी कपाशी, सोयाबीन, उडीद व मूग पिके धोक्यात आली आहेत.
-दीपक इंगळे, शेतकरी, भंडारज बु.
===Photopath===
210621\img_20210621_150907.jpg
===Caption===
???? ?????????????